प्रत्येकाला व्हावे लागेल "पृथ्वीरक्षक' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

पुणे - ""पृथ्वीला आपण आई मानतो, नदीची पूजा करतो आणि दुसऱ्या बाजूला प्रदूषण करणाऱ्यांत सहभागी होतो. सभोवताली वाढत असलेल्या प्रदूषणाला सरकार नव्हे प्रत्येक माणूसच दोषी आहे. पर्यावरणाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हे चित्र बदलायचे असेल तर प्रत्येकाला पृथ्वीरक्षक व्हावे लागेल,'' असे मत वन्यजीव चित्रपट निर्माते माईक पांडे यांनी व्यक्त केले. लोकसहभागातूनच पृथ्वीला पूर्वीचे वैभव मिळेल, असेही त्यांनी सांगितले. 

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन कुंडीतील रोपाला पाणी घालून अनोख्यापद्धतीने करण्यात आले. त्यानंतर पांडे आणि अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांना "किर्लोस्कर वसुंधरा सन्मान' प्रदान करण्यात आला. या वेळी आरती किर्लोस्कर, आयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते. 

पांडे म्हणाले, ""वातावरणातील 85 टक्के प्रदूषण हे मानवनिर्मित आहे. विकासाच्या नावाखाली केलेल्या निसर्गविरोधी कृत्यांमुळेच पृथ्वी संकटात सापडली आहे. निसर्गाची साखळी विस्कळित झाली असून, हवामान बदलाचा फटका प्रत्येक देशाला सहन करावा लागत आहे. प्रदूषणामुळे पाण्याची गुणवत्ताही ढासळत आहे.'' 

""वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अन्न उत्पादन घटतच जाणार असून या समस्यांकडे आपण गांभीर्याने पाहायला हवे. अजूनही वेळ गेलेली नाही. चुका सुधारून शाश्वत विकासाच्या दृष्टीने पावले उचलायला हवेत. लोकांची मानसिकता बदलली तरच निसर्गही बदलेल,'' असेही त्यांनी सांगितले. 

कुष्ठरुग्ण, आदिवासी, गरिबांच्या समस्या सुटाव्यात यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. "आनंदवन' बंद व्हावे, हे तर आमचे मिशन आहे. 
- डॉ. विकास आमटे, सामाजिक कार्यकर्ते 

Web Title: Kirloskar Vasundhara award