संगीतसाधिकांचा अमृत स्वरवर्षाव 

संगीतसाधिकांचा अमृत स्वरवर्षाव 

पुणे - ज्या जगद्विख्यात विदुषी किशोरीताई आमोणकरांच्या संगीतवंदनेसाठी "गानसरस्वती महोत्सव' नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला जातो, त्यात स्वत: गानसरस्वती गात आहेत आणि त्यांचं तपसिद्ध गाणं ऐकण्यासाठी आसुसलेले रसिक ते क्षण काना-मनात जपून ठेवत आहेत, अशी ती अनोखी मैफल. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची ती सकाळ जयपूर-अत्रौली घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गायनपरंपरेचं श्रवण घडविणारी होती. 

अप्रचलित अशा हुसेनी तोडी या रागातील "निरंजन कीजे' ही बंदिश विलंबित झपतालात ताईंनी मांडली. नंतर सुखिया बिलावलमधील "देवी दुर्गे' ही बंदिश सादर केली. तिला जोडून अल्हैया बिलावलमध्ये "डगर चलत मोरी छीन लई गगरी' ही स्वत: रचलेली रचना त्या गायल्या. कुठल्याही रागात त्या रागमय होतात, याचं प्रत्यंतर थक्क करणारंच होतं. सुरांच्या गहन सागरात त्या निवांतपणे नौकाविहार करत अलगद पल्याडच्या किनाऱ्यावर पोचतात. 

संध्याकाळच्या मैफलीत प्रवीण गोडखिंडी यांनी बासरीवर राग मुलतानीत विलंबित एकताल व द्रुत तीनतालातील रचना पेश केल्या. किराणा घराण्याच्या वैशिष्ट्यांचा अंतर्भाव त्यांच्या वादनात होता. बासरी जणू ख्याल गाते आहे, असा आभास. वरच्या स्वरांमधली पुकारही थेट हृदयाला भिडणारा. तंत्रकारी अंगानं त्यांनी हंसध्वनी या दाक्षिणात्य सदाबहार रागात छोटेखानी आलाप घेऊन दोन रचना पेश केल्या. 

यानंतर रघुनंदन पणशीकर यांनी झिंझोटी रागातील "महादेव विश्‍वंभर जटाजूट त्रिनयना नीलकंठ' ही विलंबित बंदिश त्यांच्या गुरू किशोरीताईंप्रमाणे सादर करत त्यात स्वत:चाही विचार वेधकपणे मांडला. "आनंदमल्हार'मधील "बरसत घन आयो रंगीलो' या रचनेनंतर "अहो, नारायणा' या अभंगानं त्यांनी शेवट केला. व्यामिश्र व अलंकारिक बंदिशींची बहार आनंददायी होती. गिरिजादेवींनी जोग रागात "कल ना परे' ही बंदिश जोमदारपणे सादर केली. देस रागावर आधारित "सैंया बुलावे आधी रात, नदिया बैरी भई' ही ठुमरी खास पूरब अंगाचा ढंग दाखवत त्यांनी प्रस्तुत केली. त्यातील बोलबनावचा आविष्कार अवर्णनीय होता. तो काना-मनात साठवत श्रोते परतत होते. 

... म्हणून मी आजही गाते 
ठुमरीसम्राज्ञी गिरिजादेवी यांना किशोरीताईंच्या हस्ते "गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्यानंतर गिरिजादेवी म्हणाल्या, ""नवोदितांचा उत्साह, स्फूर्ती टिकून राहावी म्हणून मी वयाच्या 88व्या वर्षीही गाते आहे. तरुणांनी दोन-चार वर्षांतं गाणं सोडून न देता त्याकडे साधना म्हणून पाहिल्यास आपली संगीत परंपरा शेकडो वर्षांपर्यंत टिकून राहील.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com