कर्जदाराची चारित्र्य छाननी आवश्यक - अनास्कर 

anaskar
anaskar

राजगुरूनगर (पुणे) : बँकांना कर्जदाराची फक्त आर्थिक पत्रके पाहून चालणार नाही, तर यापुढे कर्जदाराची चारित्र्य छाननी करणेही गरजेचे आहे. ती केली नाही तर अनेक नीरव मोदी, विजय मल्ल्या पाहायला मिळतील, असा इशारा बँकिंग तज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरॅशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिला. 

राजगुरूनगर सहकारी बँकेचे संस्थापक स्व. परशुराम भगीरथ आपटे यांच्या जयंतीनिमित्त ६ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या व्याख्यानात, 'सद्यस्थितीतील बँकिग' या विषयावर ते बोलत होते.  ते म्हणाले, ' देशात अर्थसाक्षरता आणणे अतिशय गरजेचे झाले आहे. लोक आर्थिक साक्षर झाल्यास खोट्या अफवांना बळी पडून चांगल्या बँकेला अडचणीत आणणार नाहीत, तसेच चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवणार नाहीत. देशातील लोकांना बँकिंग सवयी नसल्याने मोठ्या प्रमाणात अनुत्पादक पैसा पडून आहे. प्रत्येक व्यवहार जर बँकेच्या मार्फत झाला तर भारतीय अर्थव्यवस्था सक्षम होईल. समाजातील सर्व पैसा बँकिंगमध्ये आला तर समाज वर जाईल आणि देशही प्रगती करेल. एवढेच काय देशाला कर्जसुद्धा घ्यावे लागणार नाही. म्हणून बँकिंगची कला लोकांना शिकविली पाहिजे.' 

नागरी सहकारी बँकांना यापुढे नव्याने येऊ घातलेल्या पेमेंट बँकांची तीव्र स्पर्धा राहील. बँक नफाक्षम असेल तर 'एनपीए' जास्त असला तरी त्याचा बाऊ करण्यात अर्थ नाही. बँकांनी अनुत्पादक कर्जांचे निर्लेखन केले पाहिजे. कर्ज निर्लेखित करणे म्हणजे बुडीत करणे नाही, हे सभासदांना समजावून सांगितले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

नोटबंदीनंतरची बँकिंग क्षेत्रातील आणीबाणी चालू असतानाही राजगुरूनगर बँकेने गेल्यावर्षीपेक्षा एनपीएचे प्रमाण खाली आणले आहे. बँकेच्या ठेवींनी १ हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे, असे प्रास्ताविकात अध्यक्ष किरण आहेर यांनी सांगितले. स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी चारुचंद्र सोहोनी यांनी केले. सूत्रसंचालन सरव्यवस्थापक शांताराम वाकचौरे यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष परेश खांगटे यांनी मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com