'भू-करमापका'स लाचप्रकरणी अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

गेल्या तीन दिवसांत भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक लाचखोरीच्या प्रकरणात पकडला जाण्याची ही दुसरी घटना आहे. 

पिंपरी : खेड (राजगुरुनगर) येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक महंमद शफी इब्राहिम मुलाणी (वय 41, रा. कुमार क्‍लासिक बी विंग, वाडा रोड, राजगुरुनगर) यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी (ता. 6) पकडण्यात आले. 

मोजणी झालेल्या जमिनीच्या हद्दीत खुणा दाखविण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. गेल्या तीन दिवसांत भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक लाचखोरीच्या प्रकरणात पकडला जाण्याची ही दुसरी घटना आहे. 

तीन तारखेला भोर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक राजेंद्र राऊत यांनाही दहा हजार रुपयांचीच लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेच (एसीबी) अटक केली होती. त्यांनी जमिनीची लवकर मोजणी करून देण्यासाठी ही लाच घेतली होती.