आत्महत्या हा काय बाजार आहे का? : लक्ष्मी त्रिपाठी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

आत्महत्या हा बाजार आहे काय ? कोणाबरोबर बारगेनिंग करता? काय लावलय तुम्ही? जस्टिस वर्मा यांच्या ऑर्डरमुळे बलात्कारावर कायदा आला म्हणून बलात्कार थांबले कां? शेतकऱ्यांवर सध्या बलात्कारच सुरू आहे. दुसरे काय आहे हे?

पुणे - "शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय सरकारला बाजाराप्रमाणे वाटतो. त्यामुळे बारगेनिंगची भाषा सुरू आहे. हे करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे', अशा शब्दांत किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्‍वर लक्ष्मी त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे न घेता कठोर टीका केली. 

गंजपेठेतील महात्मा फुले वाड्यात येथे आज (सोमवार) सकाळी खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्‍लेष यात्रेला सुरवात झाली. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्रिपाठी उपस्थित होत्या. यावेळी त्यांचे जोरदार भाषण झाले. त्याला उपस्थितांनी जोरदार पाठिंबा दिला. त्यानंतर त्रिपाठींनी माध्यमांशी संवाद साधला. 

कर्जमाफी दिली तर आत्महत्या होणार नाहीत याची हमी द्या, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या भूमिकेबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, "आत्महत्या हा बाजार आहे काय ? कोणाबरोबर बारगेनिंग करता? काय लावलय तुम्ही? जस्टिस वर्मा यांच्या ऑर्डरमुळे बलात्कारावर कायदा आला म्हणून बलात्कार थांबले कां? शेतकऱ्यांवर सध्या बलात्कारच सुरू आहे. दुसरे काय आहे हे?'' 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबद्दल त्या म्हणाल्या, "समाजाने जागृत झाले पाहिजे. आपल्याला शेतकरी जगवतात, याची जाण ठेवून त्यांच्यासाठी काम करायला पाहिजे. मातीचे मोल, शेतकऱ्यांचा अभिमान नसलेल्या सुशिक्षितांची संख्या मोठी आहे. राजकीय व्यक्‍तींची तर चांगले करण्याची इच्छाशक्‍ती नाही. मात्र किन्नर लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. माझ्या श्‍वासात श्‍वास आहे तोपर्यंत मी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबरोबर राहणार आहे''. 

व्हिडीओ गॅलरी