नेत्यांच्या हाराकिरीने कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच ! 

नेत्यांच्या हाराकिरीने कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच ! 

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले. माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंडखोरीचे शड्डू ठोकत एकच खळबळ उडवून दिली. कार्यकर्त्यांत उत्साहाचे भरते आले; पण ज्यांच्या शब्दावर लांडे यांनी विश्‍वास ठेवला, त्यांनीच पायाखालची जमीन हिसकावून घेतली. सळसळत्या उत्साहाला पुन्हा नजर लागली. गेली काही वर्षे होणारा पाणउतारा, अपमान कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागत होता. त्याची परतफेड करण्याची नामी संधी हाताशी असताना श्रद्धेय गुरूंचा आदेश शिरसावंद्य मानून ओशाळत्या नजरेने पुन्हा तलवार म्यान करावी लागली. कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाला पुन्हा ठेच लागली. ही भळभळती जखम कुठवर सांभाळायची? त्यावर उपाय आहे की नाही, याचे उत्तर खरे तर होय असेच आहे. त्या दिशेने आता लांडे समर्थकांची वाटचाल सुरू झाली आहे... 

विधान परिषद निवडणुकीचे वारे सध्या जोरात घोंगावत आहेत. शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात जी परिस्थिती पाहावयास मिळाली, त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात छुपी युती झाल्याचे स्पष्ट झाले. पुण्यात राष्ट्रवादीला छुपा पाठिंबा देऊन भाजपने कॉंग्रेसला थोपविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठीच राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार विलास लांडे यांना माघार घ्यायला भाग पाडण्यात आले. बंडखोरी करण्यास ज्यांनी प्रवृत्त केले, त्यांनी पाठिंबा देऊ शकत नसल्याचे जाहीर करून लांडे यांना तोंडावर पाडले. दुसरीकडे ज्या पक्षात आपली सारखी घुसमट सुरू आहे, कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाला ओरखडे मारले जात आहेत, अशा पक्षात राहायचे कशाला? असा सवाल कार्यकर्ते विचारू लागले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा विचार लांडे यांच्या मनात डोकावू लागला आहे. 

असे घडले नाट्य ! 
विधान परिषदेकरिता भाजपकडून पाठिंबा मिळविण्यासाठी लांडे यांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्यांचे सहकारी मित्र भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप हे त्यासाठी अनुकूल होते; पण भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा त्यांना विरोध होता. पालकमंत्री गिरीश बापट यांनीही लांडगे यांच्या पारड्यात वजन टाकत लांडे यांना नकार दिला. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री गिरीश बापट, अजित पवार, लक्ष्मण जगताप आणि विलास लांडे एकत्र चर्चा करत असताना मुख्यमंत्र्यांचा फोन आला. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आहे, असे सांगून लांडे यांनी माघार घ्यावी, असे सुचविले. अजित पवार यांनी त्याच क्षणी लांडे यांना माघार घेण्यासाठी सांगितले. विधान परिषद निवडणुकीची सूत्रे स्वत: शरद पवार हाताळत असल्याने लांडे यांना दुसरा पर्याय नव्हता. दुर्दैवाने उशीर झाल्याने त्यांना उमेदवारी मागे घेता आली नाही; पण या घटनेमुळे लांडे यांच्या पदरी निराशा आली. 
राजकारणात आता शांत राहिलो, तर पुढे तोंड वर काढता येणार नाही, याची जाणीव लांडे यांना झाली असल्याने त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा विचार बोलून दाखविला आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही, तर ते बरोबर राहणार नाहीत. त्यामुळे त्यांना निर्णय घेणे भाग आहे. नजीकच्या काळात महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लांडे आणि त्यांचे समर्थक राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले असतील. 

खरे तर पिंपरी-चिंचवड महापालिका ही राष्ट्रवादीच्या दृष्टीने महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सध्या येथे राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्या दृष्टिकोनातून पक्षाने लांडे यांना उमेदवारी देऊन शहरासाठी एक आमदार मिळवून दिला असता, तर येणाऱ्या निवडणुकीत सत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्याचा उपयोग झाला असता; पण तसे झाले नाही. आता लांडे पक्षातून बाहेर पडल्यास येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याची किंमत मोजावी लागेल. 

राष्ट्रवादीकडूनही दुय्यम वागणूक 
विधान परिषदेसाठी अनिल भोसले यांना उमेदवारी देताना विश्‍वासात घेतले नाही, अशी प्रतिक्रिया लांडे, आझम पानसरे आणि योगेश बहल यांनी बोलून दाखविली. या नाराजीतूनच लांडे यांचे आधी उमेदवारीचे व नंतर माघारीचे नाट्य रंगले. या घटनेमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसही पिंपरी-चिंचवडकडे दुय्यम नजरेने पाहाते की काय? अशी शंका येते. आगामी काळात भोसरीतून राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्‍यता त्यामुळेच बळावली आहे. तसे झाले तर आणखी काही नेते पक्षातून बाहेर पडलेले दिसतील. हे संकेत राष्ट्रवादीसाठी चांगले नाहीत. वेळीच पडझड रोखून त्यावर उपाय करावे लागतील. नवे नेतृत्व तयार करावे लागेल. येणाऱ्या काळात पक्षांतर्गत बऱ्याच घटना पुढे येतील. याचे पडसाद महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळतील. नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपते. त्यानंतर थोड्याच अवधीत महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजेल. त्याची आचारसंहिता सुरू होताच लांडे समर्थक पक्षातून बाहेर पडण्याची तयारी करू शकतात; मात्र ते कोणत्या पक्षात जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागून आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com