कोंबड्याच्या खुराड्यात घुसलेला बिबट्या तीन तास जेरबंद

leopard
leopard

निरगुडसर (पुणे) : अनेक महिन्यापासून वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले परंतु बिबट्या काही पिंजऱ्यात शिरेना परंतु कोंबड्या खाण्याच्या नादात खुराड्यात घुसलेला बिबट्या जेरबंद झाला. तब्बल तीन तास बिबट्या आतमध्ये होता. शेवटी बिबट्याने दरवाजाला जोरदार धडक मारुन खुराड्याच्या बाहेर झेप घेऊन धुम ठोकली. हा प्रकार निरगुडसर (ता.आंबेगाव) येथे हांडेवस्तीवर गुरुवारी (ता.05) पहाटे घडला.

निरगुडसर नजीक असलेल्या हांडेवस्ती बिबट्याने अनेक ठिकाणी हल्ले करुन जनावरांना ठार मारले, या ठिकाणी दिवसाही बिबटयाचा वावर वाढला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी पिंजरे लावले. परंतु बिबट्या पिंजऱ्याला हुलकावणी देत होता. बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हांडे वस्तीरील राजु हांडे यांच्या गावठी कोंबड्याच्या खुराड्याच्या दरवाजाला धडक देऊन बिबटया आत शिरला त्यावेळी झालेल्या आवाजामुळे राजु हांडे हे जागे झाले. त्यांनी बाहेर खुराड्याकडे येऊन पाहिले असता बिबट्या आतमध्ये कोंबड्या खात असल्याचे दिसले.

त्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांतील सर्वांना याची माहिती दिली त्यावेळी जवळ जाण्याचे कुणाचे धाडस होत नव्हते, परंतु बिबट्या कोंबड्यांवर ताव मारत असताना हळुच दरवाजाला बाहेरुन पत्रे व दगड लावले त्यामुळे जवळपास तीन तास बिबट्या त्या खुराडयात जेरबंद होता.

परंतु बिबट्या आतमध्ये अधिकच डरकाळ्या फोडु लागला त्यानंतर बिबट्याने दरवाजाला जोरदार धडक देऊन लावलेले पत्रे व दगड सपाट करुन बाहेर झेप घेतली. त्यानंतर बिबटया जवळच्या शेतात पसार झाला. हे थरारनाट्य दोन वाजल्यापासुन तीन वाजेपर्यंत सुरु होते. यावेळी राहुल हांडे, राजु हांडे, गणेश हांडे, धीरज हांडे, महेंद्र हांडे या ठिकाणी होते. त्यावेळी माजी उपसरपंच रामदास वळसेपाटील यांनी वनविभागाच्या कर्मचार्यांना अनेक वेळा दूरध्वनीवरुन साधलेला संपर्क अयशस्वी ठरला.

परंतु पोलिसांना याची माहिती देऊन ते घटनास्थळी आले. गुरुवारी दुपारी वनविभागाचे मंचर परिक्षेत्र अधिकारी प्रज्योत पालवे यांनी भेट देऊन पाहणी केली, यावेळी माजी उपसरपंच रामदास वळसेपाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच बिबटयाला पकडण्यासाठी पिंजराही लावण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com