मुलाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

पुणे - खंडणीसाठी शास्त्रज्ञ दांपत्याच्या पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण आणि खून करणाऱ्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी जन्मठेप सुनावली. तसेच, त्याला 75 हजार रुपये दंडही ठोठावला. 

पुणे - खंडणीसाठी शास्त्रज्ञ दांपत्याच्या पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण आणि खून करणाऱ्यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी जन्मठेप सुनावली. तसेच, त्याला 75 हजार रुपये दंडही ठोठावला. 

परविंदर स्वरण सिंग (वय 24, रा. डीएससी क्वार्टर सुरक्षा आवास, बावधन) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर शुभ भूपेंदर रावल या मुलाचे अपहरण आणि खून केल्याचा आरोप ठेवला होता. हा गुन्हा सप्टेंबर 2012 मध्ये चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी बारा जणांची साक्ष नोंदविली. फिर्यादीतर्फे ऍड. एस. देशमुख यांनी बाजू मांडली. या कामात त्यांना पोलिस अधिकारी के. व्ही. गायकवाड यांनी मदत केली. साक्ष आणि परिस्थितिजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. 

या प्रकरणी भूपेंदर रावल (रा. पाषाण) यांनी फिर्याद दिली होती. ते एआरडीई येथे तर त्यांची पत्नी एचईएमआरएल येथे शास्त्रज्ञ आहेत. त्यांना शुभ आणि आरव अशी दोन मुले होती. घटनेच्या दिवशी भूपेंदर घरी होते, तर त्यांची पत्नी रात्री घराजवळील गणेश मंडपात आरतीसाठी गेल्या होत्या. रात्री साडेनऊपर्यंत शुभ हा जेवणासाठी घरी न आल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर तो हरविल्याची तक्रार नोंदविली गेली होती. याच भागात राहणारा आणि या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपी हा रावल यांच्याकडे आला. त्याने परविंदर सिंग याने शुभचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा कट रचला होता, अशी माहिती दिली. त्यानुसार त्यांनी सिंग याच्याकडे चौकशी केल्याने त्याने गुन्ह्याची कबुली दिली.