मातीच नसल्याने व्यवसायावर मर्यादा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे - ""कुंभाराचा व्यवसायच मातीवर अवलंबून. पण करणार काय? घाऊक व्यापाऱ्यांकडून गुजरातहून आलेली माती विकत घ्यायची. आपल्या ऐपतीप्रमाणे मूर्ती तयार करायच्या आणि विकायच्या, यावरच गेली पंधरा-वीस वर्षे कुंभारवाड्यातील कुंभार व्यावसायिकांना गुजराण करावी लागत आहे. मातीच मर्यादित राहिल्याने व्यवसायावरही मर्यादा आल्या आहेत, परराज्यांतून येणाऱ्या मातीवरच ऐंशीटक्के काम अवलंबून आहे, असे व्यावसायिक विजय कुंभार सांगत होते. 

शहरात जसे कॉंक्रीटचे जंगल वाढू लागले. तशी माती मिळणेही कुंभारांना मुश्‍कील होऊ लागले. नदीपात्रातही राडारोडा टाकल्याने पात्रालगत माती राहिली नाही. पण नागपंचमीला नागाच्या मूर्ती, दहीहंडीसाठी मातीच्या हंड्या, हरितालिका व गणेशमूर्ती, देवीच्या मूर्तींकरीता माती तर पाहिजे. मग काय ! व्यवसाय तर करायचा आहे. अखेर घाऊक विक्रेत्यांकडून कुंभार व्यावसायिकांना माती खरेदी करावी लागत आहे. शहरालगतच्या उपनगरांतील जमिनीदेखील बहुतांश शेतकऱ्यांनी विकल्या. तेथे इमारती उभ्या राहिल्यामुळे शेतातील मातीसुद्धा मूर्तीसाठी मिळत नसल्याची खंत कुंभार व्यवसायिकांनी बोलून दाखविली. व्यवसाय करायचा असल्याने मातीला पर्याय म्हणून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवरसुद्धा त्यांना अवलंबून राहावे लागत आहे. 

विजय म्हणाले, ""सोलापूरहून माती येते. पण कुंड्या, माठ करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. गणेशोत्सवाच्या आधी चार महिने (गणेश जन्मापासून) आम्ही कामाला लागतो. तेव्हा कुठे व्यवसायाचा ताळमेळ बसविता येतो. काही व्यावसायिक येथेच दहीहंड्या व विविध देवदेवतांच्या मूर्ती व सण-उत्सवाप्रमाणे मातीच्या वस्तू तयार करतात. पण तरीही मातीसाठी परराज्यांवरच अवलंबून राहावे लागते. ऐन उत्सवाच्या जवळपास कारागिरांना जादा भाव देऊन कामाला ठेवावे लागते. त्यातही कोण किती रोजगार देतोय. त्यावर कारागीर कामाला येतात.'' 

व्यावसायिक अशोक कुंभार म्हणाले, ""शहरात मातीच नसल्यामुळे रोजगारावरही परिणाम झाला आहे. गुजरातहून माती आणणे अशक्‍य आहे. कारण त्यासाठीची लाखो रुपयांची गुंतवणूक कोण करणार? साहजिकच व्यवसायावरही मर्यादा आल्या. श्रावण, भाद्रपद महिन्यात विक्री बऱ्यापैकी होते. त्यातून रोजगार मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करतो.'' 

Web Title: Limit on business due to lack of soil