वाहन खरेदीसाठी रांगा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

सलग दुसऱ्या दिवशीही गर्दी; सवलतींचा फायदा घेण्यासाठी लगबग

सलग दुसऱ्या दिवशीही गर्दी; सवलतींचा फायदा घेण्यासाठी लगबग
पुणे - प्रदूषण वाढविणाऱ्या बीएस-3 इंजिनच्या गाड्यांची विक्री उद्यापासून (शनिवार) बंद होणार असल्यामुळे वाहन कंपन्यांनी जाहीर केलेल्या सवलतीचा फायदा घेण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशीही (शुक्रवारी) डीलर्सकडे ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या; परंतु विक्रीसाठी गाड्या शिल्लक नसलेल्या डीलर्सनी "स्टॉक संपला' असा फलक लावल्यामुळे ग्राहकांना निराश होऊन परतावे लागले. दरम्यान, दोन दिवसांत शहरात किती गाड्यांची विक्री झाली, याची माहिती आरटीओकडून रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही.

बीएस-3 वाहनांच्या विक्रीवर एक एप्रिलपासून बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे वाहन कंपन्यांनी या गाड्यांच्या विक्रीसाठी गुढीपाडव्याच्या दिवशी किमतीवर विविध सवलती जाहीर केल्या होत्या. मात्र, त्याला फारशी प्रसिद्ध न मिळाल्याने या कंपन्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, गुरुवारी अचानक या कंपन्यांकडून गाड्यांवर पाच हजारांपासून 25 हजारपर्यंची सवलत जाहीर करण्यात आली. एसएमएस, बल्क मेसेज, व्हॉट्‌सऍप, फेसबुक या सोशल मीडियाचा वापर करून या सवलतीची माहिती कंपन्यांनी ग्राहकांपर्यंत पोचविली, तर 31 मार्चपर्यंत खरेदी केलेल्या गाड्यांची नोंदणी करून घेणार असल्याचे आरटीओने जाहीर केल्यामुळे ग्राहकांनी विविध कंपन्यांच्या शोरूमला गर्दी केली होती. त्यामुळे काल दिवसभर शहरात हा चर्चेचा विषय झाला होता.

आज शेवटचा दिवस, वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि विविध कंपन्यांनी दिलेल्या सवलतीच्या जाहिरातींमुळे आज सकाळपासून नागरिकांनी विविध कंपन्यांच्या डीलर्सकडे गाड्या खरेदीसाठी गर्दी केली होती. काही ठिकाणी नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र होते. मात्र, डीलर्सकडील गाड्या शिल्लक नसल्याने त्यांनी "स्टॉक संपला' असे फलक लावले. होंडा या कंपनीने आज दिवसभर शोरूमच बंद ठेवले होते. हीरो, सुझुकी, टीव्हीएस आणि अन्य कंपन्यांच्या डीलर्सकडे काही गाड्या शिल्लक असल्याने त्याचा फायदा नागरिकांना घेता आला. पुणे शहरात होंडा, हीरो, बजाज, टीव्हीएस, यामाहा आणि सुझुकी या कंपन्यांच्या दुचाकी डीलर्सची संख्या 45 इतकी आहे. या सर्व डीलर्सकडे नागरिकांकडून दिवसभर चौकशी सुरू होती; परंतु गाड्या शिल्लक नसल्यामुळे अनेकांना नाराज होऊन परत जावे लागले.

विविध मार्गांचा अवलंब
गाड्यांच्या किमतीवर भरघोस सवलत मिळत असल्याचा फायदा घेण्यासाठी नागरिकांनी विविध मार्गांचा अवलंब केला. पुण्यात गाड्या उपलब्ध नाहीत, याची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्यातील डीलर्सकडे अनेकांनी संपर्क साधला. त्यांच्याकडे गाड्या शिल्लक नसल्याने अनेकांना नाराज व्हावे लागले, तर काही जणांना मात्र गाड्या उपलब्ध झाल्याने आनंद झाला.

Web Title: line for vehicle purchasing