साहित्यनिर्मिती दुखण्याइतकी खरी - डॉ. जावडेकर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

सतत नवे लिहावे 
रा. रं. बोराडे म्हणाले, ""साहित्य हे एकाचवेळी साहित्य असते आणि तो माणसाच्या जगण्याचा इतिहाससुद्धा असते. साहित्यिकांनी सतत नव्या लेखनाचा आणि लेखन प्रकारांचा शोध घेत राहायला हवा.'' 

पुणे - ""सर्जन ही कधीही न थांबणारी गोष्ट आहे. लिहिता लेखक आणि लिहिता कवी यांनी कधीही थांबू नये. आवड हा तुमच्या सर्जनाचा मूळ गाभा असतो. साहित्य निर्मिती ही आपल्या जगण्याइतकी आणि दुखण्याइतकी खरी असते,'' असे मत लेखक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी येथे व्यक्त केले. 

"अग्निपंख'तर्फे आयोजित युवा मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी झालेल्या परिसंवादात जावडेकर बोलत होते. "माझ्या सर्जनाची भूमी आणि भूमिका', या विषयावर हा परिसंवाद होता. लेखिका मनस्विनी लता रवींद्र, साहित्यिक बालाजी मदन इंगळे, कादंबरीकार सुशील धसकटे, जावडेकर, प्रा. अनिलकुमार साळवे हे परिसंवादात सहभागी झाले होते, तर ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे हे अध्यक्षस्थानी होते. 

जावडेकर म्हणाले, ""संगीत काय आणि साहित्य काय, या मुळात सामाजिक घटना असतात. त्यातून एक भाष्य केलेले असते. साहित्य प्रकारांना लेबल लावणे हे योग्य नाही.'' 

इंगळे म्हणाले, ""तंत्रज्ञानाच्या युगात अस्मानी सुलतानी संकटे तशीच राहिली. शेतकऱ्यांची अवस्था बदलली नाही. मी या भवतालाचा भाग बनून माझे लेखन केले; पण मी भूमिका घेऊन लिहीत नाही. जे अनुभवले तेच लिहिले. 

मनस्विनी म्हणाल्या, ""प्रत्येकाची लेखन प्रक्रिया स्वतंत्र, मात्र एका बिंदूला ते एकत्रसुद्धा येत असल्याचे पाहायला मिळते. ती अभिव्यक्ती असते. अर्थात, सुचेल तसे ओकून मोकळे व्हायला हवे. लिखाण हा आपल्या स्वतःचा एक शोध असतो.'' 

धसकटे म्हणाले, ""आत्ताचा काळ हा भूमिका न घेण्याचा काळ आहे. भूमिका घेतली की गडबड होते. मात्र, लेखकाने त्याची तमा न बाळगता लिहायला हवे.'' 

सतत नवे लिहावे 
रा. रं. बोराडे म्हणाले, ""साहित्य हे एकाचवेळी साहित्य असते आणि तो माणसाच्या जगण्याचा इतिहाससुद्धा असते. साहित्यिकांनी सतत नव्या लेखनाचा आणि लेखन प्रकारांचा शोध घेत राहायला हवा.''