परराज्यातील गाठींपेक्षा स्थानिक साखरगाठींना पसंती

अनंत काकडे
गुरुवार, 23 मार्च 2017

चिखली - गेल्यावर्षीच्या तुलनेत साखरेच्या दराबरोबरच दूध पावडर आदी कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाल्याने यावर्षी साखरगाठींच्या दरात वीस टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी परराज्यातील स्वस्त साखरगाठीची मोठी आयात केली आहे; परंतु स्थानिक गाठी भेसळविरहित आणि दर्जेदार असल्याने ग्राहकांकडून स्थानिक गाठीलाच मोठी मागणी होत असून, पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील व्यापाऱ्यांनी सुमारे दीड लाख किलो गाठीची मागणी स्थानिक कारखानदारांकडे केली आहे.

चिखली - गेल्यावर्षीच्या तुलनेत साखरेच्या दराबरोबरच दूध पावडर आदी कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाल्याने यावर्षी साखरगाठींच्या दरात वीस टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी परराज्यातील स्वस्त साखरगाठीची मोठी आयात केली आहे; परंतु स्थानिक गाठी भेसळविरहित आणि दर्जेदार असल्याने ग्राहकांकडून स्थानिक गाठीलाच मोठी मागणी होत असून, पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील व्यापाऱ्यांनी सुमारे दीड लाख किलो गाठीची मागणी स्थानिक कारखानदारांकडे केली आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे पाच लाख किलो साखरगाठींची विक्री केली जाते. त्यासाठी गुजरात, राजस्थान आदी परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात साखरगाठीची आयात केली जाते. परंतु भेसळविरहित, चांगला दर्जा यामुळे स्थानिक गाठीला ग्राहकांची मोठी पसंती असते. साखरगाठी बनविण्यासाठी साखर, दूध पावडर, लिंबू, दोरा, भट्टीसाठी सरपण आदी कच्चा माल लागतो. त्याचबरोबर साखरगाठी बनविण्यासाठी प्रशिक्षित कारागिराची गरज असते. यावर्षी मजुरीच्या दरात विशेष वाढ झाली नाही.

एक क्विंटल साखरगाठी करण्यासाठी मजुरांना पंधराशे रुपये मोजावे लागतात; परंतु गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी साखर, दूध पावडर, लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गाठीतील  मुख्य घटक साखर असतो.

गेल्यावर्षी साखरेचा दर क्विंटलला २ हजार ६०० रुपये होता. यावर्षी तो चार हजार रुपये म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत क्विंटलमागे सोळाशे रुपयांनी वाढला आहे. तसेच साखरेची मळी निघून जाऊन गाठी आधिक स्वच्छ व्हावी यासाठी लिंबाचा वापर केला जातो. यंदा लिंबाचे दर घटले आहेत; परंतु साखरगाठी आधिक खुसखुशीत होण्यासाठी लागणारी दूध पावडर, बांधणीसाठीचा दोरा, भट्टीसाठी लागणारे सरपण आदी कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.  गेल्यावर्षी ठोक बाजारात स्थानिक गाठीचे दर सहा हजार ते ६५०० रुपये क्विंटल होता. तर किरकोळ बाजारात नव्वद ते शंभर रुपये होता. यंदा गाठीच्या भावात वाढ झाल्याने घाऊक बाजारात गाठीचा दर क्विंटलमागे आठ ते साडेआठ हजारांपर्यंत गेला आहे. तर किरकोळ बाजारात शंभर रुपयापासून सव्वाशे रुपयांपर्यंत दर जाण्याची शक्‍यता आहे. तर परराज्यातील साखरगाठीचा दर क्विंटलमागे ५६०० ते सहा हजार आहे. तर किरकोळ बाजारात हा दर सध्या ऐंशी ते नव्वद रुपये किलो आहे. 

पिंपरी येथील साखरगाठीचे कारखानदार राजू परदेशी म्हणाले, दर्जेदार मालामुळे स्थानिक गाठीला मोठी मागणी आहे. त्यासाठी प्रशिक्षित कारागिरांची गरज असते. मजुरीचा दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढतो. गाठीचा दरही वाढतो. त्यामुळे गुजरात व इतर भागातून आयात केलेली गाठी स्वस्तात मिळत असल्याने काही व्यापारी परराज्यातील गाठी खरेदी करतात; परंतु परराज्यातील गाठीत दूध पावडर, लिंबाचा वापर करत नाहीत. तसेच या गाठीत साखरे ऐवजी सनजीरा पावडरची भेसळ केली जाते. त्यामुळे दर्जेदार आणि भेसळरहित स्थानिक गाठी घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो.

Web Title: local sakhargath demand increase