विमानतळ विस्तारीकरणाचा टेक ऑफ

Pune-Airport
Pune-Airport

पुणे - लोहगाव विमानतळाच्या आवारात नवी इमारत उभारण्याच्या आराखड्याला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एआयआय) नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या नव्या इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रवासीकेंद्रित पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच नवी इमारत तयार करण्यासाठी ४७५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प टप्प्याटप्याने पूर्ण होणार आहे. 

लोहगाव विमानतळाच्या आवारातील सध्याची इमारत वाढत्या प्रवासी संख्येला अपुरी पडत होती. त्यामुळे गेल्या तीन-चार वर्षांपासून नव्या इमारतीची चर्चा सुरू होती. विमानतळ प्राधिकरणाने त्याचा आराखडा तयार केला. एआयआयला तो सादरही केला. त्याची छाननी होऊन या आराखड्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. लोहगाव विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी त्याला दुजोरा दिला आहे. 

अशी असेल नवी इमारत 
विमानतळाच्या सध्याच्या  इमारतीशेजारी पूूर्वेकडील बाजूस सुमारे ४२ हजार चौरस फुटांची नवी इमारत असेल. तळ मजल्यावर प्रवेश करता येईल. पहिल्या मजल्यावर बोर्डिंगची व्यवस्था असेल तर, दुसऱ्या मजल्यावर प्रवासीकेंद्रित सुविधा असतील. या इमारतीमध्ये ५ नवे एरोब्रिज असतील. तसेच प्रवासीसामानाची वाहतूक करण्यासाठी ४-५ नवे कन्व्हेर बेल्टही उभारण्यात येतील. या इमारतीमध्ये रेस्टॉरंट, दुकाने आणि स्वच्छतागृहे असतील. चेक इन काऊंटर आणि सिक्‍युरिटी चेकच्या काऊंटरची संख्या वाढविण्यात येणार आहे. प्रवाशांना बसण्यासाठी खास व्यवस्था या इमारतीमध्ये असेल. तसेच विमान कंपन्यांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांच्यासाठीही सुविधा येथे असेल.

जूनमध्ये कामाला सुरवात
विमानतळाच्या नव्या इमारतीचा आराखड्यासाठी निविदा तयार करण्याचे काम सुरू आहे. १५ मे पर्यंत निविदा जागतिक स्तरावर प्रसिद्ध होतील. ४५ दिवस त्यांची मुदत असेल. त्यानंतर जूनपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. 

पुरंदरमधील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारण्यासाठी किमान पाच वर्षे लागणार आहेत. लोहगाव विमानतळावरील प्रवासी संख्येत दरवर्षी किमान २० ते २५ टक्‍क्‍यांनी वाढ होत आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षे तरी पुणेकरांना याच विमानतळावर अवलंबून राहावे लागणार आहे. वाढती प्रवासी संख्या आणि विमान कंपन्यांची वाढती उड्डाणे लक्षात घेता लोहगाव विमानतळ आगामी पाच-सात वर्षे तरी कोणत्याही बाबतीत कमी पडणार नाही.
-अजयकुमार,  विमानतळ संचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com