लोणावळा नगराध्यक्षांच्या घरासमोर करणीचा प्रकार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

लोणावळा - नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या निवासस्थानी रविवारी (ता.16) सकाळी मृत्युचक्र आणि काळी बाहुली बांधलेल्या तिरडीचा उतारा आढळून आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार करणी व अंधश्रद्धेचा कळस गाठणारी असल्याची चर्चा शहरात आहे. 

नगराध्यक्षा सुरेखा जाधव या नगरसेवकाच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी सध्या केरळला गेल्या आहेत. रविवारी सकाळी त्यांच्या घराच्या दरवाज्यासमोर काळीबाहुली, लिंबू-मिरची, हळदी-कुंकू, गंडेदोरे बांधलेली तिरडी नागरिकांना दिसली. एका कागदावर नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या नावाचा उल्लेख असलेली चिठ्ठीही मिळाली. यामध्ये मृत्युचक्र रेखाटले असून, जाधव यांच्या मृत्यूची तारीख, वेळ, ठिकाण आणि कारणाचा उल्लेख करण्यात आला आहे. 

पोलिसांना सदर वस्तू घटनास्थळावरून हटविल्या. नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या, अंधश्रद्धांवर माझा विश्वास नाही. खोडसाळ प्रकारांना घाबरत नाही. समाजकंटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी. नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुरेखा जाधव यांनी विकासकामे सुरू केली आहेत. त्यांच्या लोकप्रियतेमुळेच हा प्रकार करण्यात आला असावा, अशी चर्चा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Web Title: Lonavala mayor's house superstition

टॅग्स