बोरघाटात रेल्वेवर दरड कोसळली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

‘सकाळ’नेही दिला होता इशारा
घाटमार्गातील धोकादायक ठरणाऱ्या दरडींचे कित्येक वर्षे सर्वेक्षणच झाले नसल्याची बाब पुढे येत आहे. याबाबत ‘सकाळ’ने पाहणी करून याबाबत इशाराही दिला होता. रेल्वेकडे पूर्वी घाट सेक्‍शनमधील दरडींची पाहणी करण्यासाठी व धोकादायक दरडींना सुरुंग लावत त्या पाडण्यासाठी कर्मचारी कार्यरत होता. मात्र काही वर्षांपूर्वी हा कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर रेल्वेने त्याच्या जागेवर कर्मचारीच नेमला गेलेला नसल्याची माहिती एका रेल्वे कर्मचाऱ्याने दिली. कोकण व घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडतो आहे. यामुळे घाटात दरडी कोसळण्याचे संकट कायम आहे.

लोणावळा - पुणे-मुंबई लोहमार्गावर बोरघाटातील मंकी हिल ते ठाकूरवाडीदरम्यान हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला एक्‍स्प्रेसवर सोमवारी (ता. २१) पहाटे पाचच्या सुमारास दरड कोसळली. यातील एक भला मोठा दगड डब्याचे छत फाडून प्रवाशांवर कोसळला, तर दुसरा दगड छतावरच अडकला. यात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वेवर दरड कोसळण्याची महिन्यातील ही चौथी घटना आहे.

शिवप्रसाद मल्लाप्पा हिरेमठ (वय ३०, रा. भांडूप, मुंबई), हुसेन इमाम बेळबंकी (वय ६०), महंमद आसिफ (वय २५, दोघे रा. हुबळी, कर्नाटक) अशी जखमींची नावे आहेत. हुबळी एक्‍स्प्रेस ही गाडी सोमवारी पहाटे चार वाजून बत्तीस मिनिटांनी लोणावळा स्थानकातून कुर्ल्याकडे रवाना झाली. पहाटे साधारणतः पाचच्या सुमारास बोरघाटातील रेल्वे किलोमीटर क्र.११६/४५ जवळ अप लाइनवर भली मोठी दरड हुबळी एक्‍स्प्रेसच्या ‘एस ४’ या बोगीवर आदळली. गाडीचे छत फाडत एक भला मोठा दगड आतमध्ये पडल्याने गाडीतील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले, तर दुसरा मोठा दगड गाडीच्या छतावरच अडकला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गाडीच्या चालकाने प्रसंगावधान राखत गाडी उभी केली. या वेळी बहुतेक प्रवासी झोपेत होते. मात्र अधिक हानी टाळण्यासाठी हुबळी एक्‍स्प्रेस कर्जतला नेण्यात आली. या ठिकाणी दरड पडलेली बोगी रिकामी करत त्यातील दरड बाहेर काढण्यात आली. त्यानंतर गाडी तासभर उशिराने मुंबईला रवाना झाली. अपघातातील जखमींना तातडीने कल्याण येथील रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एक जण गंभीर आहे. यादरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या अर्धा तास उशिराने धावत असल्याने रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळित झाली. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले. 

सुरक्षा रामभरोसे
जानेवारीपासून बोरघाटात लोहमार्गावर दरड कोसळण्याची ही पाचवी घटना आहे. यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांसह तिघांना प्राण गमवावे लागले. बोरघाटात बोगद्याच्या तोंडावर दरडी पडण्याच्या व लोहमार्ग खचण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात लोहमार्गावर दरड पडल्याने हैदराबाद एक्‍स्प्रेसचे इंजिन घसरले होते. मालगाडीचे डबे घसरण्याचा प्रकारही झाला होता. तसेच सिंहगड एक्‍स्प्रेससमोरही दरड कोसळली होती. सातत्याने होणाऱ्या या घटनांमुळे बोरघाटात रेल्वे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे. 

Web Title: lonavala news Hubli Express Lonavlaa Monkey Hill rock