द्रुतगती मार्गावर होणार ‘मिसिंग लिंक’

‘मिसिंग लिंक’चे रेखाचित्र.
‘मिसिंग लिंक’चे रेखाचित्र.

लोणावळा - यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर बोरघाटातील वाहतूक कोंडी आणि अपघातांवर रामबाण उपाय ठरणाऱ्या खोपोली एक्‍झिट ते कुसगाव बु. येथील सिंहगड इन्स्टिट्यूटदरम्यान प्रस्तावित ‘मिसिंग लिंक’ला’ पर्यावरण विभागाने परवानगी दिली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेल्या पर्यावरण विषयक जनसुनावणीत एकही हरकत दाखल झाली नाही. मात्र, अजूनही घाटमार्गातील वनविभागाच्या ८० हेक्‍टर जमिनीचे संपादन व नाहरकत प्रमाणपत्र मिळाले नाही. 

लोणावळ्यात झालेल्या पर्यावरण विषयक सुनावणीदरम्यान रस्ते विकास महामंडळ, महसूल खाते, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वनखात्याच्या अधिकारी कुसगाव बु., चावणी, आडोशीचे ग्रामस्थ उपस्थित होते. 

वर्षाअखेरीस कामाला सुरवात
मुंबई-पुणे हा महामार्ग हा ९५ किलोमीटर लांबीचा असून सहा पदरी आहे. बोरघाटात द्रुतगती मार्ग व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ यांच्या मार्गिका सामाईक असल्याने अपघात व वाहतूक कोंडी होते. ती टाळण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगतीस पर्याय म्हणून खोपोली एक्‍झिट ते कुसगाव बु. येथील सिंहगड इन्स्टिट्यूटदरम्यान प्रस्तावित रस्त्यास २०१६ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. सदर प्रकल्पासाठी देशी-परदेशी १६ कंपन्यांनी निविदा भरल्या असून त्यांची छाननी सुरू आहे. प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाची नाहरकत मिळाली असली तरी वनविभागाकडून जागेचे हस्तांतर तसेच काही परवानग्या मिळण्याची प्रतीक्षा आहे. वर्षअखेरीस कामास सुरवात होईल, अशी शक्‍यता रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली.

हानी नाही
राज्य रस्ते विकास महामंडळाने एस. एन. भोबे असोसिएट्‌सला प्रकल्पाचा तपशील अहवाल तयार करण्यासाठी नेमले आहे. त्यांच्या वतीने पर्यावरण मूल्यांकन अभ्यास, पर्यावरणीय मंजुरी, परवाने आणि वनखात्याकडून लागणारे परवाने मिळविण्याची जबाबदारी ‘बिल्डिंग इन्व्हायरमेंट इंडिया प्रा. लि.’ या कंपनीवर टाकली आहे. कंपनीच्या वतीने प्रस्तावित द्रुतगती मार्गाच्या कामामुळे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे पर्यावरणीय परिसंस्थेला कुठलीही हानी पोचणार नसल्याचे निष्कर्ष काढला आहे.

‘मिसिंग लिंक’ म्हणजे...
 खोपोली एक्‍झिट ते कुसगाव बु. दरम्यान द्रुतगती महामार्गाच्या राहिलेल्या लांबीचे आठ पदरी नवीन बांधकाम करणे.
 एकूण लांबी १३.३ किलोमीटर, खालापूर टोल नाक्‍यापर्यंत साडेसहा किलोमीटर अंतर वाढणार
 पुणे-मुंबईदरम्यानचे अंतर २४ मिनिटांनी कमी
 रायगडमधील आडोशी, चावणी, भानवज तर मावळमधील कुरवंडे, भुशी, कुसगाव बु., खंडाळा आदी गावे बाधित
 आशियातील सर्वांत लांब ८.९ किमी व १.६ किमी लांबीचे दोन बोगदे
 ९०० मीटर व ६५० मीटरचे २ व्हायाडक्‍ट
 हलक्या व अवजड वाहनांसाठी वेगवेगळे नियोजन
 प्रकल्प खर्च ४७९७.५७ कोटी रुपये
 प्रकल्पासाठी लागणारे क्षेत्र १३३ हेक्‍टर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com