"तनिष्कां'ना मत देण्यासाठी लांबच लांब रांगा

tanishka
tanishka



पुणे ः नवी मुंबई, धारावीपासून पुणे जिल्ह्यातील दुर्गम मुळशी तालुक्‍यात, तसेच बारामती, मोरगाव, महाबळेश्‍वर येथे आज सकाळपासून महिला मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या त्या तनिष्का उमेदवारांना मत देण्यासाठी. परिणामी, विधानसभा निवडणुकीत मिळावी, अशी मते काही ठिकाणी तनिष्कांनी मिळवली आहेत. तालुका पातळीवर मिस्ड कॉलद्वारे सर्वाधिक मते (34 हजार) मिळविण्याचा मान बारामतीतील तनिष्काने पटकावला.


सातारा, बारामती, पौड, बीडसह कळंबोली आदी ठिकाणी तनिष्का व्यासपीठाच्या निवडणुकीला जोरदार प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्‍यात झालेल्या निवडणुकीत आदिवासी कातकरी भगिनीही मतदानात सहभागी झाल्या. बारामती तालुक्‍यात बारामती शहर, शिर्सुफळ, सुपे व मोरगाव या चार केंद्रांवर मतदानासाठी गर्दी होती. महिलांनी रांगा लावत मतदानाचा हक्क बजावला. बारामतीसह गुनवडी, डोर्लेवाडी, झारगडवाडी, माळेगाव, शारदानगर परिसरांतून महिला मतदानासाठी आल्या होत्या. बारामतीत तनिष्का उमेदवारांना मिळालेली मते बघता विधानसभा-नगरपालिका निवडणुकीइतकेच कष्ट त्यांनी घेतल्याचे जाणवले.
ग्रामीण भागात कांदा लागवडीची, कापूस वेचणीची गडबड सुरू असतानाही महिलांनी तनिष्का उमेदवारांना मोठ्या उत्साहात मतदान केले. अनेक ठिकाणी महिलांनी सकाळी शेतात जाताना पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. सातारा जिल्ह्यात वावरहिरे (ता. माण), राजापूर, निमसोड, गारवडी, सिद्धेश्‍वर कुरोली (ता. खटाव), कुसरुंड (ता. पाटण) व कुमठे (ता. कोरेगाव), पांगारी (ता. महाबळेश्‍वर) येथे महिलांनी थंडीतही उत्साहात मतदान केले. कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथे महिलांनी सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. मतदानाची वेळ संपेपर्यंत महिला मतदानासाठी येत होत्या. खटाव तालुक्‍यात सध्या कांदा लागवडीची कामे सुरू असतानाही महिलांनी शेतात जाण्यापूर्वी मतदान केले. ठिकठिकाणी महिलांमध्ये तनिष्का निवडणुकीची उत्सुकता होती.
बीड जिल्ह्यात पाडळशिंगी आणि टाकरवण येथे मतदान झाले. मतदान करून महिला कापूस वेचणीला गेल्याचे दृश्‍य दोन्ही केंद्रांवर होते. जिल्ह्यात सध्या कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील महिला पहाटे उठून घरातील कामे आवरून शेतात जातात. नव्या मुंबईतही वातावरण तनिष्कामय झाले होते. कळंबोलीत दोन हजारांपेक्षा जास्त महिलांनी प्रत्यक्ष मतदानात भाग घेतला.

पहिले मतदान, मग टिळा!
बारामतीच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या तनिष्कांनी निवडणुकीनंतर एकमेकींना पेढा भरवून, औक्षण करत निवडणूक कार्यक्रमाचा समारोप करत उपस्थितांना सुखद धक्का दिला. मोरगावकरांनी अशी निवडणूक व निवडणुकीनंतरचा दोन्ही उमेदवारांकडून सुखद समारोप प्रथमच अनुभवला. पुणे जिल्ह्यात "तनिष्काग्राम'चा पहिला मान पटकाविलेल्या मुळशी तालुक्‍यातील भालगुडी गावातील सर्व तनिष्का सदस्य शेताची कामे बाजूला ठेवून मतदानासाठी आल्या होत्या. तसेच टिळ्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वऱ्हाडी महिलांनी प्रथम पौड येथील मतदान केंद्रावर येऊन मत दिले. नंतरच त्या टिळ्याच्या कार्यक्रमाला गेल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com