गर्भपातासाठी लूट

योगिराज प्रभुणे
शनिवार, 1 एप्रिल 2017

रुग्णांच्या हतबलतेमुळे जादा कमाई

पुणे - कायद्याने गर्भपाताच्या गोळ्या देण्याचा आणि गर्भपात करण्याचा अधिकार केवळ स्त्रीरोग आणि प्रसूतितज्ज्ञांनाच असताना आयुर्वेदिक आणि अन्य डॉक्‍टर सर्रास गर्भपात करीत असल्याचे उघडकीस आले आणि म्हैसाळच्या धक्कादायक प्रकारानंतर त्यावर बंदी घालण्यात आली. मात्र त्याचा गैरफायदा उठवत अनेक स्त्रीरोगतज्ज्ञ गोळ्या आणि तपासणीसाठी रुग्णांची अक्षरशः लूट करू लागले आहेत. 

रुग्णांच्या हतबलतेमुळे जादा कमाई

पुणे - कायद्याने गर्भपाताच्या गोळ्या देण्याचा आणि गर्भपात करण्याचा अधिकार केवळ स्त्रीरोग आणि प्रसूतितज्ज्ञांनाच असताना आयुर्वेदिक आणि अन्य डॉक्‍टर सर्रास गर्भपात करीत असल्याचे उघडकीस आले आणि म्हैसाळच्या धक्कादायक प्रकारानंतर त्यावर बंदी घालण्यात आली. मात्र त्याचा गैरफायदा उठवत अनेक स्त्रीरोगतज्ज्ञ गोळ्या आणि तपासणीसाठी रुग्णांची अक्षरशः लूट करू लागले आहेत. 

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील स्त्रीभ्रूणहत्याकांडानंतर गर्भपाताच्या गोळ्यांच्या विक्रीबाबत चौकशीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येऊ लागली आणि आयुर्वेदिक व इतर डॉक्‍टर करीत असलेल्या गर्भपातास आळा बसू लागला. 

विक्रीसाठी येणाऱ्या प्रत्येक गोळीचा चोख हिशेब ठेवण्याचे बंधन औषध व सौंदर्यप्रसाधन कायद्यात आहे. मात्र अनेक वर्षे तो कायदा पायदळी तुडवला जात होता. गोळ्यांचे हिशेब ठेवण्यात येत नव्हते; तसेच इतरही पॅथी डॉक्‍टरांच्या चिठ्ठ्यांवरून ते गोळ्या पुरवत होते. मात्र २०१३ मध्ये बीडमध्ये स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकरण झाले आणि कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू झाली. गोळीचा हिशेब ठेवण्याचे बंधन जाचक वाटल्याने विक्रेत्यांनी या गोळ्यांची विक्रीच बंद केली. तेव्हापासून स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतितज्ज्ञच तपासणीबरोबर गोळ्या देऊ लागले. त्यांची मक्तेदारी निर्माण झाल्याने ही लूट होत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. त्यासाठी स्वतंत्र पॅकेज तयार झाल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. 

शुल्काची रक्कम चार हजारांपर्यंत
आपली मक्तेदारी होत असल्याचे लक्षात आल्याने स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञांनी गोळ्या आणि तपासणीसाठी तीन हजार ते चार हजार रूपये एवढे शुल्क आकारायला सुरवात केली आहे. आतापर्यंत गोळ्या आणि तपासणीसाठी केवळ दीड हजार रुपये आकारण्यात येत होते. पाच गोळ्यांच्या एका पाकिटावरील छापील किंमत ३७५ ते ५०० रुपये एवढी असते. त्यात सुमारे एक हजार रुपये तपासणी शुल्क हे तज्ज्ञ घेत असत. आता या गोळ्यांची किंमत तेवढीच राहिली असली, तरी आपले शुल्क मनाला येईल त्या पद्धतीने हे तज्ज्ञ वाढवत आहेत. याशिवाय प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्याचा खर्च आणखी वेगळा येतो. त्यामुळे आपण लुटलो जात असल्याची रुग्णांची भावना झाली आहे. 
 

गर्भपात आणि वैद्यकीय सल्ला
गर्भपात आणि वैद्यकीय सल्ल्याचे आतापर्यंत दीड ते दोन हजार रुपये शुल्क स्त्रीरोग आणि प्रसूतितज्ज्ञांकडून आकारले जात होते; पण गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. गर्भपाताच्या एका किटमध्ये पाच गोळ्या येतात. त्यावर ३७५ ते ५०० अशी त्यावरील छापील किंमत आहे. प्रत्यक्षात या गोळ्या आणि वैद्यकीय सल्ला मिळून तीन ते चार हजार रुपये डॉक्‍टर घेतात. हे पॅकेज आता महाग झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातही तुम्ही ओळख काढून गेला, तर मात्र त्यात दोन हजार रुपये आकारले जातात.

स्त्रीरोगतज्ज्ञांवरील या आरोपांबाबत विचारले असताना डॉ. निशिकांत क्षोत्री यांनी तज्ज्ञ लूट करीत असल्याचे अमान्य केले. ते म्हणाले, ‘‘गर्भपाताच्या गोळ्यांची किंमत स्ट्रीपवर छापलेली असते. त्यापेक्षा जास्त किंमत कोणालाच आकारता येत नाही आणि कोणत्या डॉक्‍टरांनी त्यांच्या वैद्यकीय सल्ल्याची फी किती ठेवावी, यावर कोणतेही बंधन नाही,’’ त्यास डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी दुजोरा देत सांगितले की, गोळ्यांचा दुरुपयोग टाळण्यासाठी यावर मर्यादा घातल्या आहेत. गर्भपातासाठी शल्यचिकित्सकाचे कौशल्य आवश्‍यक असते. गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी करण्यासाठी, त्यानंतर ती गोळी कोणाला दिली याच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात.

या तज्ज्ञांची बाजू समोर येऊनही गेल्या काही महिन्यांत तपासणी शुल्कात अवाच्या सवा वाढ का करण्यात आली, या प्रश्‍नाचे उत्तर मात्र मिळू शकले नाही.

Web Title: loot for abortion