...तर आदिवासी वसतिगृहातील कर्मचाऱ्यांवर कारवाई - सावरा

...तर आदिवासी वसतिगृहातील कर्मचाऱ्यांवर कारवाई - सावरा

हडपसर येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाबाबत शासनाकडे तक्रारी आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली असून, तेथील कर्मचाऱ्यांना वसतिगृहात लक्ष घालण्याची सूचना केली आहे. वसतिगृहाबाबतच्या सूचनांचे कर्मचाऱ्यांनी पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन आदिवासीमंत्री विष्णू सावरा यांनी दिले आहे.

आमदार मेधा कुलकर्णी यांनी या वसतिगृहातील असुविधांबाबत मांडलेल्या तारांकित प्रश्‍नाला दिलेल्या लेखी उत्तरात सावरा यांनी हे आश्‍वासन दिले आहे. भोजनामध्ये दोन्ही वेळेस बटाटा मिक्‍स भाजी दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी उपोषण केले होते. 

यंदाच्या शैक्षणिक वर्षात वसतिगृहात ११५ विद्यार्थी आहेत. त्यांना प्यायच्या पाण्यासाठी आर ओ फिल्टर, वॉटर कूलर उपलब्ध आहेत. स्वच्छतेसाठी नियमित सफाई कामगार आहेत. परंतु वसतिगृह भाडेतत्त्वावर आहे. तेथील खोल्यांच्या पत्र्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित मालकास दिले आहेत, असेही सावरा यांनी म्हटले आहे.

-----------------------------------------------

एकवीरा देवी मंदिराच्या कळस चोरीप्रकरणी गुन्हा
कार्ला येथील एकवीरा देवीच्या मंदिरावरील सोन्याचा कळस ऑक्‍टोबरमध्ये चोरीला गेला असून, याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधी तपास सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

विधान परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे आणि सुनील तटकरे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले. मंदिराच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक व पोलिस बंदोबस्त असतानाही सोन्याचा कळस चोरीला गेला. याप्रकरणी सरकारने काय कार्यवाही केली, असा प्रश्‍न गोऱ्हे व तटकरे यांनी उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मंदिराच्या सुरक्षिततेसाठी पोलिस गार्ड असून ते गाभाऱ्याची सुरक्षा पाहतात, असे उत्तरात म्हटले आहे.

-----------------------------------------------

बोपोडी-खडकीतील जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही
पुणे महापालिकेच्या बीआरटी  प्रकल्पाअंतर्गत आठ रस्त्यांच्या कामांसाठी तज्ज्ञ सल्लागारांना चार कोटी ८१ लाख रुपये अदा केले आहेत. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आवश्‍यक तेथे दुरुस्ती करण्यात येत असून, चार रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई-पुणे रस्त्यावरील दोन किलोमीटरचे काम अंतिम टप्प्यात असून, बोपोडी व खडकी कॅंटोन्मेंट हद्दीतील जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, संगमवाडी रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विधान परिषदेत आमदार अनिल भोसले यांनी पुणे शहरातील बीआरटीच्या कामासाठी नेमलेल्या सल्लागारांवर अनावश्‍यक खर्च होत असल्याबाबत तारांकित प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले. बीआरटीच्या कामाची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करण्यात येत असून, तज्ज्ञ सल्लागारांच्या सूचनेनुसार आवश्‍यक तो बदलही केला जात आहे. गणेशखिंड रस्त्याचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून घेण्यात येत आहे. पुणे-सातारा रस्त्याचे कामही ४० टक्के झाले असून, उर्वरित काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. पुणे महापालिकेच्या विशेष बैठकीत सल्लागारांची नावे, त्यांनी केलेली कामे, त्यांना दिलेले शुल्क (फी) याबाबतची माहिती दिली होती, असेही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात नमूद केले आहे.

-----------------------------------------------

रोहित्रांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजनांच्या सूचना
खडकवासला व परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महावितरणमार्फत तेथील ट्रान्सफॉर्मरला (रोहित्र) जाळीचे कुंपण बसविले आहे. तसेच, रोहित्र आणि आजूबाजूच्या जागेच्या सुरक्षिततेसाठी जाळ्या, कुंपण, पत्र्याचे आच्छादन आदी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लेखी उत्तराद्वारे दिली. 

खडकवासला, धनकवडी, बालाजीनगर, बिबवेवाडी, वडगाव, किरकटवाडी, कोथरूड, वारजे, बावधन, भुसारी कॉलनी या भागात महावितरणने बसविलेल्या रोहित्रांच्या सुरक्षिततेबाबत आमदार भीमराव तापकीर यांनी तारांकित प्रश्‍न मांडला. त्यावर ऊर्जामंत्र्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, रामबाग कॉलनी, खडकवासला येथील रोहित्रांच्या अतिरिक्त सुरक्षिततेची बाब निदर्शनास आल्यानंतर तेथे जाळ्या बसविल्या आहेत. खबरदारीच्या आवश्‍यक त्या उपाययोजना महावितरण घेत आहे. दरम्यान, रोहित्रांभोवती सुरक्षिततेच्या दृष्टीने कुंपण व जाळ्या नसणे. परिणामी, एखादी दुर्घटनाही होऊ शकते. त्यामुळे महावितरणला लेखी कळवूनही पाठपुरावा होत नाही. याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही, असेही तापकीर यांनी प्रश्‍नाद्वारे ऊर्जामंत्र्यांसमोर महावितरणच्या कारभाराचा मुद्या मांडला. मात्र, त्याविषयी बावनकुळे यांनी सुरक्षिततेची कामे हाती घेण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

-----------------------------------------------

‘जी नेक्‍स्ट’ काळ्या यादीत
पुणे येथील ‘जी नेक्‍स्ट टेक सोल्यूशन मीटर रीडिंग एजन्सी’ने महावितरण कंपनीच्या सेंट मेरी उपविभागाअंतर्गत ७७०९ ग्राहकांना शून्य युनिटची बिले देऊन शासनाचे सुमारे पाऊणे दोन कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. या एजन्सीने ‘बॅक हमी दस्त’ चोरी करून बनावट दस्त जमा केल्याची गंभीर बाब निदर्शनास आली असून, एजन्सी विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. एजन्सीचे कंत्राटदेखील रद्द केले असून, संबंधित एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लेखी उत्तरात दिली.

आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत याबाबत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. सेंट मेरी उपविभागातील ग्राहकांचे विजेचे बिल मोबाईलद्वारे फोटो रीडिंग घेण्यासाठी संबंधित एजन्सीला आदेश देण्यात आले होते; परंतु ऑगस्ट महिन्यात अनेक ग्राहकांना शून्य युनिट बिल देण्यात आल्याचे उघडकीस आले. मात्र या सर्व ग्राहकांना सप्टेंबरमध्ये त्यांनी वापरलेल्या विजेच्या युनिटप्रमाणे बिले आकारण्यात आली आहेत. एजन्सीवर समर्थ पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बनावट दस्त जमा केल्याप्रकरणीदेखील एजन्सीवर गुन्हा दाखल केला आहे. या एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याबाबतची नोटीसही देण्यात आल्याचे बावनकुळे यांनी उत्तरात नमूद केले आहे.

-----------------------------------------------

जादा रकमेची बिले;कंत्राटदारांवर कारवाई
वडगाव शेरी भागातील १७१ ग्राहकांच्या वीज मीटरचे रीडिंग चुकीच्या पद्धतीने घेतल्याच्या तक्रारी महावितरणकडे आल्या आहेत. संबंधित ग्राहकांच्या बिलांची दुरुस्ती करण्यात आली असून, रीडिंग घेणाऱ्या या कंत्राटदाराला सुमारे ७७५० रुपये दंड आकारण्यात आला आहे, अशा प्रकारच्या चुका होऊ नयेत, यासाठी कंत्राटदारांना सक्त ताकीद देण्यात आली असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.  

आमदार जगदीश मुळीक यांनी याबाबतचा प्रश्‍न उपस्थित केला होता. वडगाव शेरी येथील नागरिकांना आलेल्या जादा रकमेच्या बिलांसंदर्भातील तारांकित प्रश्‍नाला बावनकुळे यांनी उत्तर दिले. ऑगस्ट महिन्यात तेथील बहुतांश ग्राहकांना जादा दराने वीजबिल आकारण्यात आले असून, कंत्राटदार शासनाची फसवणूक करत आहेत. यासंबंधी शासनाने चौकशी केली आहे काय, कंत्राटदाराविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली, असे प्रश्‍न मुळीक यांनी उपस्थित केले होते. त्यावर तक्रार आली असून, वीजबिलांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच, संबंधित कंत्राटदाराला दंड ठोठावल्याचे बावनकुळे यांनी उत्तरात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com