'नोकऱ्या ही सर्व समाजाची समस्या '

'नोकऱ्या ही सर्व समाजाची समस्या '

पुणे - 'मराठा समाजाचे मोर्चे शिस्तबद्ध निघत आहेत, हे कौतुकास्पद आहे; पण नोकऱ्या हा प्रश्‍न केवळ मराठा समाजापुरता मर्यादित नाही. तो सगळ्या समाजाचा प्रश्‍न बनला आहे. सगळ्या प्रांताचा झाला आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन वाढत असले तरी नोकऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे नव्या पिढीचे करायचे काय? हा खूप मोठा सामाजिक प्रश्‍न बनला आहे. तो एका जातीपुरता राहिला नाही. त्यामुळे धोरणकर्ते, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते अशा सर्वांनी एकत्र येऊन हा प्रश्‍न सोडवायला हवा‘‘, असे स्पष्ट मत "सकाळ‘चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

पुणे नवरात्रोत्सवाचा मानाचा समजला जाणारा "महर्षी पुरस्कार‘ माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पवार यांना प्रदान करण्यात आला. या वेळी तुडुंब भरलेल्या सभागृहाने उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. पुणेरी पगडी, मानपत्र, शाल, पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप होते. पवार यांच्या पत्नी भारती पवार, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागूल आणि जयश्री बागूल उपस्थित होत्या. पुरस्कार समारंभानंतर निवेदक सुधीर गाडगीळ यांनी प्रतापराव पवार यांच्याशी संवाद साधला. यानिमित्ताने पवार यांची उद्योग, सामाजिक, शैक्षणिक यासह विविध क्षेत्रांतील "वाटचाल‘ उलगडत गेली. 

मराठा मोर्चावरील प्रश्‍नाला उत्तर देताना पवार म्हणाले, ""इस्राईलमध्ये कुठलाही प्रश्‍न असला की ते लोक एकत्र येऊन सोडवतात. पुन्हा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. मलेशिया, कोरिया, चीन यांनीही आपापल्या पद्धतीने त्यांचे प्रश्‍न सोडविले. या देशातील लोकांपासून आपणही शिकायला हवे. तरच आपल्या तरुणांना नवी संधी मिळू शकेल. त्यांच्या शक्तीचा सदुपयोग करून घेता येईल. यातून देशाला दिशा देता येईल.‘‘ मी अनेक संस्थांशी संबंधित आहे. "टीम वर्क‘मुळे या सर्व संस्था उत्तम कार्य करत आहेत. त्यामुळे या संस्थांतील सर्व सहकारी, कामगार यांना मी हा पुरस्कार अर्पण करतो, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. 

प्रतिभा पाटील म्हणाल्या, ""समाजात माणसे पुष्कळ आहेत; पण जो समाजोपयोगी, देशोपयोगी काम करतो तोच माणूस समाजाच्या लक्षात राहतो. पवार यांचे कार्यही असेच आहे.‘‘ काही महिन्यांपूर्वी आपल्याकडे दुष्काळ होता. मात्र, आता भरपूर पाऊस पडला आहे; पण पाणी अडविण्याची साधने कमी आहेत. पडीक विहिरी सिमेंटने बांधून त्यातसुद्धा पावसाचे पाणी साठवून ठेवले पाहिजे. पाऊस नाही अशावेळी या विहिरीतले पाणी "प्रोटेक्‍टिव्ह इरिगेशन‘ पद्धतीने वापरले पाहिजे. हे काम वाढावे यासाठी "सकाळ‘ने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली. 

"लोकमत‘ने खोटारडेपणा केला 
""ऑडिट ब्युरो सर्क्‍युलेशन‘चे परिमाण जगभरातील वर्तमानपत्र मानतात. त्यांनी "सकाळ‘ला "तुम्ही नंबर एकवर आहात‘, असे शिफारस पत्र सलग दोन वेळा दिले. तरी "लोकमत‘सारख्या एका जबाबदार दैनिकाने "ऑडिट ब्युरो सर्क्‍युलेशन‘च्या या निर्णयाला डावलून एका छोट्या जाहिरात संस्थेची मदत घेतली आणि शहरात खोट्या जाहिराती लावल्या. हे दुर्दैवाचे आणि बेजबाबदारपणाचे आहे. "ऑडिट ब्युरो सर्क्‍युलेशन‘वर "लोकमत‘ही आहे. त्यांना या संस्थेचे निर्णय मान्य नसतील तर त्यांनी या संस्थेवर राहू नये. तेथून बाहेर पडावे. शेवटी वाचकांना हे सगळे कळते. आम्हाला वाचकांचे प्रेमच अधिक महत्त्वाचे वाटते,‘‘ असे प्रतापराव पवार यांनी सांगितले. 

प्रतापराव पवार म्हणाले 
- कुठलाही चिनी माल विकत घेणे हे देशद्रोहासमान मानले पाहिजे 
- वेळ अजिबात वाया घालवत नाही. त्यामुळे एकावेळी अनेक संस्थेत काम करू शकतो 
- चांगला समाज घडवायचा असेल, तर आधी तुम्ही काय करता, हा प्रश्‍न खूप महत्त्वाचा 
- प्रश्‍नांची नुसती आस्था असून उपयोगाचे नाही; ते सोडविण्याची धडपडही तुमच्यात हवी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com