PCMC : 'स्थायी'चे अध्यक्षपदही "भोसरी'कडे

उत्तम कुटे
बुधवार, 29 मार्च 2017

'सरकारनामा'चा अंदाज ठरला खरा
सावळे यांचे पारडे जड असून त्याच 'स्थायी'च्या अध्यक्ष होण्याची चिन्हे असल्याचे वृत्त सरकारनामाने कालच (ता.26) दिले होते.

पिंपरी  : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या भाजपच्या
पहिल्या अध्यक्षपदाचा मान शिवसेनेतून आलेल्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा
सावळे यांना मिळाला आहे. फक्त त्यांच्या औपचारिक निवडीची घोषणा येत्या
शुक्रवारी (ता.31) होणार आहे. यानिमित्ताने पालिकेच्या खजिन्याची चावी
सभागृहनेते एकनाथ पवार यांच्यानंतर भाऊंच्याच (चिंचवडचे भाजप आमदार
लक्ष्मण जगताप) दुसऱ्या समर्थकाकडे गेली आहे.

पवार आणि सावळे हे दोघेही शहरातील भाजपचे दुसरे आमदार दादांच्या (महेश लांडगे) भोसरी मतदारसंघातील असले,तरी ते भाऊंचे समर्थक आहेत. महापौर हे मानाचे पद नितीन काळजे यांच्या रूपाने लांडगे यांनी मिळविले असले,तरी पालिकेच्या खजिन्याची चावी (स्थायीचे अध्यक्षपद) मात्र, भाऊंनी पटकावले आहे. सावळे यांचे पारडे जड असून त्याच 'स्थायी'च्या अध्यक्ष होण्याची चिन्हे असल्याचे वृत्त सरकारनामाने कालच (ता.26) दिले होते.

आज दुपारी तीन ते पाच अशी स्थायीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची
वेळ होती. त्यात सावळे यांचा एकमेव अर्ज आल्याचे नगरसचिव उल्हास जगताप
यांनी सांगितले. यावेळी आमदार लांडे व त्यांच्या समर्थक नगरसेवकाची अनुपस्थिती खूप काही सांगून गेली. स्थायीत तुटपुंजे संख्याबळ असल्याने विरोधी बाकावरील राष्ट्रवादी ही निवडणूक लढविणार नसल्याने ती बिनविरोध होणार असल्याचा सरकारनामाने काल दिलेल्या बातमीतील अंदाजही तंतोतंत खरा ठरला. फक्त पुरुष होणार की महिला आणि जुना की नवा याची उत्सुकताच काय ती बाकी होती.

अनुभवाचा निकष आणि अद्याप नव्या सभागृहात मागासवर्गीय नगरसेवकाला न मिळालेले पद विचारात घेता सावळे यांना हे पद भाजपने दिल्याची चर्चा आहे. त्यांची नगरसेवकपदाची दुसरी टर्म असल्याने अनुभवी नगरसेवक असल्याची बाबही विचारात घेतली गेल्याचे समजते. दादांनीच त्यांचे नाव सुचविले असल्याचे सावळे यांनी अर्ज भरल्यानंतर भाऊंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. मात्र, दादा यावेळी हजर नव्हते.

उमेदवार एक,मात्र अर्ज दाखल चार
सावळे यांचा एकमेव अर्ज सत्ताधारी भाजपकडून आज दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी दाखल झाला. मात्र, त्यांनी एक नव्हे,तर चार अर्ज भरले. प्रत्येक अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून स्थायी समिती सदस्याची सही लागते. अशी सही केलेल्यांना या पदासाठी उमेदवारी अर्ज भरता येत नाही. अशा रीतीने या पदासाठीचे दावेदार असलेले हर्शल ढोरे,आशा शेंडगे यांच्यासह आठ सदस्य तांत्रिकदृष्ट्या पक्षाने अडकवून ठेवले. ही सावळे यांच्या चार अर्ज भरण्यामागील मेख असल्याचे नंतर लक्षात आले.

Web Title: mahesh landage's influence over PCMC standing committee