गळकी घरे-शाळा, पाण्यासाठी वणवण!

अविनाश गुंजाळ
सोमवार, 30 जुलै 2018

भीमाशंकर - पुनर्वसनानंतरही माळीण (ता. आंबेगाव) ग्रामस्थांची पाठ सोडायला समस्या तयार नाहीत. गावठाणात उभारलेली नवे घरे आणि शाळा इमारतीला पावसाळ्यात गळती लागते, तर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अद्यापही दोन कुटुंबे घरांच्या प्रतीक्षेत आहेत.  

भीमाशंकर - पुनर्वसनानंतरही माळीण (ता. आंबेगाव) ग्रामस्थांची पाठ सोडायला समस्या तयार नाहीत. गावठाणात उभारलेली नवे घरे आणि शाळा इमारतीला पावसाळ्यात गळती लागते, तर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अद्यापही दोन कुटुंबे घरांच्या प्रतीक्षेत आहेत.  

माळीण गावावर ३० जुलै २०१४ रोजी डोंगर कोसळून ४४ कुटुंबांतील १५१ लोक मृत्युमुखी पडले. रात्रभर पडलेल्या पावसाचे पाणी डोंगराला पडलेल्या भेगात साठून डोंगराचा कडा कोसळला होता. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन व सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने तीन वर्षांत माळीणचे पुनर्वसन पूर्ण झाले. पण येथे पडणाऱ्या संततधार पावसामुळे नवीन गावठाणातील घरे व शाळांना गळती लागली आहे. काही ठिकाणचा भाग खचला आहे. पुनर्वसित माळीणचा लोकार्पण सोहळा होऊन एक वर्ष पूर्ण झाले, तरी कमल जनार्दन लेंभे, अनसूया भीमराव झांजरे ही दोन कुटुंबे घरांच्या प्रतीक्षेत आहेत. ही कुटुंबे आजही जुन्या पत्र्याच्या शेडमध्ये राहत आहेत. त्यांना माळीण पुनर्वसनमध्ये घरे मिळावीत. ते शक्‍य नसल्यास पंतप्रधान आवास योजना, शबरी किंवा यशवंत घरकुल योजनेतून घरे मिळावीत, यासाठी सरकारकडे पाठपुरावा असल्याचे सरपंच हौसाबाई असवले यांनी सांगितले.

माळीण पुनर्वसनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी विहिरी, विंधनविहिरी घेण्यात आल्या. लाखो रुपये खर्चूनही या योजनांना पाणी नाही. उन्हाळ्यात आठवड्यातून २ ते ३ वेळा टॅंकरने पाणी यायचे. येथील जलशुद्धीकरण केंद्र अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागते. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी पाणी रोज सोडत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, लोकार्पण सोहळ्यानंतर आढळलेल्या त्रुटींवर  उपाययोजना केल्याने डोंगरावरून गावात येणाऱ्या पाण्याला दगडाचे बांध घालण्यात आले आहेत. गटारांची कामे पूर्ण केली आहेत. ठिकठिकाणी पिचिंगचे काम केल्याने गावठाणातील भराव खचण्याचे प्रकार बंद झाले आहेत.

‘सरकारकडून न्याय मिळेना’
माळीण गावठाणात आमच्या घरांच्या नोंदी नसल्यामुळे आम्हाला घरे मिळाली नाहीत. आम्हाला घरे मिळत नाहीत; तोपर्यंत आम्ही तात्पुरत्या शेडमध्ये राहणार असल्याचे कमल जनार्दन लेंभे, अनसूया भीमराव झांजरे यांनी सांगितले.

Web Title: Malin rehabilitation Bhimashankar