पुनर्वसित माळीण गावाचे एप्रिलमध्ये लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

जिल्हाधिकारी प्रशासनाची माहिती; 67 घरांसह पुनर्वसित माळीणचे काम पूर्ण

जिल्हाधिकारी प्रशासनाची माहिती; 67 घरांसह पुनर्वसित माळीणचे काम पूर्ण
पुणे - अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटीमुळे संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले होते. त्यामध्ये जवळपास 151 जण मृत्युमुखी पडले होते. आता हे गाव पुन्हा नव्याने आंबडे येथील आठ एकर जागेमध्ये उभारले आहे. त्यात 67 नवीन घरांसह अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, आरोग्य केंद्र, समाजमंदिर आणि ग्रामपंचायत कार्यालयाचा समावेश आहे. या पुनर्वसित माळीण गावाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे म्हणाले, 'माळीण पुनर्वसन प्रकल्प पूर्ण झाला आहे. 67 घरांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी प्रशासनाकडून 2 एप्रिल ही संभाव्य तारीख मुख्यमंत्री कार्यालयाकडे मागण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुनर्वसित नवीन माळीण प्रकल्पाचे उद्‌घाटन केले जाईल. हा प्रकल्प क्रिएशन्स इंजिनिअरिंग प्रा. लि.(सीईपीएल) आणि टेलिसीस आर्किटेक्‍ट या दोन कंपन्यांनी पूर्ण केला आहे.''

तसेच माळीण पुनर्वसन प्रकल्पाचे सल्लागार आणि क्रिएशन्स इंजिनिअरिंग प्रा. लि.चे अभियंता योगेश राठी म्हणाले, ""एक एप्रिल 2015 मध्ये आंबडे येथील आठ एकर जागेचे संपादन करून 18 मे 2015 रोजी प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. तब्बल 11 महिन्यांमध्ये भूकंपरोधक (अल्युफॉर्म शटरिंग) 67 घरांची बांधणी पूर्ण झाली.

त्यामध्ये 1 हजार 500 चौ. फुटांच्या जागेमध्ये 425 चौ. फुटांच्या तीन खोल्यांचे एक घर अशी 67 घरे बांधून तयार आहेत. तसेच गावामधील पायाभूत सुविधा जसे रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पथदिवे तयार करण्यात आले आहेत. गावामध्ये जिल्हा परिषद शाळा इमारत, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, गुरांची छावणी, समाजमंदिर, एसटी बसस्टॉप हेदेखील उभारण्यात आले आहेत. जुन्या माळीण गावांमधील जुन्या 15 झाडांना पुन्हा नव्याने जीवदान देण्यात आले असून, तब्बल 500 झाडेदेखील लावण्यात आली आहेत. नगररचना विभागाकडून प्रकल्प पूर्णत्वाचा दाखला गुरुवारी (ता. 23) देण्यात आला आहे.''

माळीण दुर्घटनेचा घटनाक्रम
- 30 जुलै 2014 - माळीण गाव अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली, 151 जण मृत्युमुखी
- 20 ऑगस्ट 2014 - "माळीण पुनर्वसन प्रकल्प' हाती
- 1 एप्रिल 2015 - आंबडे गावातील आठ एकर जागेचे संपादन
- 11 महिन्यांमध्ये 67 घरांचे बांधकाम पूर्ण
- 425 चौ. फुटांच्या एका घराला 8 लाख रुपये खर्च
- "पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी)' तत्त्वावर 5 कोटी रुपये खर्च
- 2 कोटी राज्य शासन, तर उर्वरित 3 कोटी रुपयांचा निधी "सीएसआर'मधून

मूळ माळीण गावामध्ये 151 झाडांचे "स्मृतिवन'
माळीण पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत मूळ माळीण गावातील अपघात झालेल्या अडीच एकर जागेमध्ये 151 मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ "स्मृतिवन' उभारण्यात आले आहे. राज्य वन विभागाच्या वतीने प्रत्येक मृत व्यक्तीच्या नावाने विविध 151 झाडे लावण्यात येणार आहेत. या स्मृतिवनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

Web Title: Malin village rehabilitated in April released