माणिकडोहला मळगंगा मातेचा चांदीचा मुखवटा चोरीस ; तीन बंद घरेही फोडली

दत्ता म्हसकर
रविवार, 22 एप्रिल 2018

अक्षयतृतीयेला चांदीचा 1 किलो 36 ग्रॅम वजनाचा 53 हजार रुपये किंमतीचा हा मुखवटा समारंभपूर्वक विधिवत कार्यक्रमाने मातेस बसविण्यात आला होता. मारुती मंदिरा शेजारी राहणारे रामचंद्र मंजाबा ढोबळे रोज सकाळी मातेची पूजाअर्चा करतात.

जुन्नर : माणिकडोह ता.जुन्नर येथील मळगंगा मातेच्या एक किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच परिसरातील बाहेरगावी राहण्यास असणाऱ्या तिघांची घरे चोराकडून फोडण्यात आली आहेत. मळगंगामातेचे मंदिर गावाबाहेर असल्याने तसेच यापूर्वी दानपेटी व मुखवट्याची चोरी झाल्याच्या घटना घडल्याने हा मुखवटा सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातील हनुमान मंदिरात ठेवला होता. 

अक्षयतृतीयेला चांदीचा 1 किलो 36 ग्रॅम वजनाचा 53 हजार रुपये किंमतीचा हा मुखवटा समारंभपूर्वक विधिवत कार्यक्रमाने मातेस बसविण्यात आला होता. मारुती मंदिरा शेजारी राहणारे रामचंद्र मंजाबा ढोबळे रोज सकाळी मातेची पूजाअर्चा करतात. आज सकाळी मंदिरात आलेनंतर दरवाजाचा कोयंडा तुटला असल्याचे लक्षात आले. यामुळे चोरी झाल्याचा त्यांना संशय आला त्यांनी तेथून मारुती मंदिराकडे धाव घेतली मंदिराला कुलूप असल्याने विजय ढोबळे यांना देवीचा मुखवटा ठेवतो तेथे आहे का ते पाहण्यास सांगितले. मंदिराचे पुजारी हरिदास वाकचौरे यांनी मंदिर उघडले तेथे मुखवटा नसल्याचे दिसून आले.कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुखवटा चोरी केला असल्याची ग्रामस्थांची खात्री पटली यानंतर जुन्नर पोलिसांकडे ढोबळे यांनी तक्रार दिली. घटनास्थळी श्वानपथक तसेच ठसे तज्ञांना बोलविण्यात आले होते. 

दरम्यान, रात्री या भागाची वीज बंद करून चोऱ्या करण्यात आल्या असल्याचे ग्रामस्थांचा संशय आहे. तीन घरापैकी एका घराचे कुलूप तोडण्यात आले असून, उर्वरित दोन घरातील सामानाची उचकापाचक केली आहे.संबधित घरमालक परगावी राहत असल्याने ही घरे बंद होती घरमालक आल्यानंतर नेमके काय चोरीस गेले हे कळणार आहे. जुन्नर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: ManikDoh Goddes Silver Jwelary Theft