उत्साहात पार पडला ; माजी विद्यार्थी मेळावा

Manjari Hadpasar School Students Get together
Manjari Hadpasar School Students Get together

मांजरी : तुझं कसं चाललयं....मुलं काय करतात......नातवंडांचं शिक्षण काय म्हणतयं...अशी ख्याली खुशाली विचारण्यापासून अगं कुठं असतेस....कित्ती वर्षांनी भेटतोय.....कसे आहेत सगळे......अशा अपुलकीच्या प्रश्र्नांपर्यंतचे संवाद आणि महाविद्यालयीन जीवनातील मर्मबंधातील आठवणींना उजाळा देण्यापासून गरजू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे, अशी सामाजिक जाणीव समृध्द करणाऱ्या चर्चा येथील अण्णासाहेब मगर महाविदद्यालयाच्या प्रांगणात रंगल्या. निमित्त होते महाविद्यालयाच्या गेल्या पंचेचाळीस वर्षात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठीच्या स्नेहमेळाव्याचे.                                 

हडपसर येथील बंटरस्कूल ते अण्णासाहेब मगर शैक्षणिक संकुल असा प्रवास करत गेल्या पंचेचाळीस वर्षात मगर महाविद्यालयाने घडवलेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याच्या निमित्ताने येथील माजी विद्यार्थी संघाने महाविद्यालयाच्या सहकार्याने स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड व संघाचे अध्यक्ष सुरेश घुले यांच्या हस्ते झाले.

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, हवेली पंचायत समितीचे उपसभापती अजिंक्य घुले, नगरसेवक हेमलता मगर, मारुती तुपे, बाजार समितीचे उप सभापती भूषण तुपे, संघाचे उपाध्यक्ष अॅड. महादेव वाल्हेर, प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी सुनील बनकर,चंद्रकांत मगर, प्रशांत सुरसे, कृष्णकांत कोबल, प्रा. नितीन लगड, विकास रासकर, जीवन जाधव, फारूख इनामदार, रुपाली चाकणकर, डॉ. शोभा पाटील, भारती शेवाळे, राहुल शेवाळे, मच्छिंद्र कामठे, चंद्रकांत मगर, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. आनंद महाजन डॉ. सुनिता डाकले, प्रा. अनिल जगताप, डॉ. प्रवीण ससाणे, संदीप हरपळे आदी यावेळी उपस्थित होते.

महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या तीन पिढ्या या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रीत आल्या होत्या. वयाची पासष्टी गाठलेल्या विद्यार्थ्यांपासून बाविशीतल्या तरूणांपर्यंतचे माजी विद्यार्थी येथे एकत्र आले होते. अनेक वर्षांनी झालेल्या गाठीभेटीने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. जुन्या आठवणींच्या चर्चा, गप्पा, खोड्या, किस्से व हास्य कल्लोळाने हा मेळावा उत्तरोत्तर रंगला होता. आपल्या जुन्या शिक्षक, मित्र-मैत्रिणीची भेट झाल्याने एक वेगळा आनंद सारेच जण अनुभवत होते. अनेक जन ऋणानुबंध जपत भूतकाळात रमले होते.  आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन आठवणी ताज्या केल्या. 

१९७१ साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. या माजी विद्यार्थ्यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे माजी विद्यार्थी संघाची नोंदणी केली आहे. या संघाच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, विद्यार्थी दत्तक योजना तसेच विद्यार्थी विकास उपयोगी विधायक उपक्रम राबविले जात आहेत. 

मेळाव्यात अनेक माजी विद्यार्थ्यांनी गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी मदत तर विविध क्षेत्रात विशेष यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीसे जाहीर केली आहेत. यावेळी उच्चतम कामगिरी करणाऱ्या माजी विध्यार्थ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. 

प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेश घुले यांनी केले, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांनी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी ऋणानुबंध प्रस्थापित करण्याचे अावाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com