मांजरी रेल्वेगेट आजपासून बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मांजरी - रेल्वे प्रशासनाकडून मांजरी बुद्रुक रेल्वेगेट क्रमांक तीनच्या परिसरात काही दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्या सकाळपासून (ता. २६)  पुढील तीन दिवस या गेटवरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने त्याबाबतच्या लेखी सूचना नियमित व सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित घटकांना दिलेल्या असून, गेटच्या दोन्ही बाजूंनाही तसे सूचना फलक लावण्यात आले आहेत. 

गुरुवारपासून शनिवारपर्यंत सलग दिवस-रात्र रेल्वेगेट क्रमांक तीनच्या दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे रेल्वेगेट बंद ठेवून येथील वाहतूक त्या काळात बंद केली जाणार आहे. या रस्त्यावरून सध्या मोठी वाहतूक वाढली आहे. गेट बंद राहण्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.

प्रवाशांना दूरवरून प्रवास करावा लागणार आहे. हडपसरकडून येथून मांजरी खुर्द, आव्हाळवाडी, वाघोली, कोलवडी या ठिकाणी ये-जा करण्यासाठी मगरपट्टा-मुंढवा बायपासवरून केशवनगर मार्गाचा पर्यायी वापर करावा लागेल. पुणे-सोलापूर महामार्गावरून द्राक्ष संशोधन केंद्र येथून भापकर मळा हा रस्ताही पर्यायी मार्ग आहे; मात्र, या रस्त्यावर रेल्वे ट्रॅकखाली कमी उंचीचा भुयारी मार्ग आहे. त्यातून अवजड वाहने ये-जा करत नाहीत; परंतु दुचाकी व चारचाकी वाहनांना हा रस्ता वापरता येणार आहे. कोलवडी व थेऊरला जाण्यासाठी थेऊर फाटा येथील पर्यायी रस्ता आहे. 

अनेकदा या गेटवर लावलेल्या सूचनेकडे वाहनचालकांकडून लक्ष दिले जात नाही. त्यामुळे प्रत्यक्ष रेल्वेगेट बंदच्या दिवशी रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूंना वाहनांची कोंडी होत असते. याशिवाय रेल्वेगेटवर येईपर्यंत नवीन वाहनचालकांना गेट बंद असल्याची कल्पना येत नाही. त्यामुळे मोठी गैरसोय होते. यासाठी रेल्वे प्रशासनाने व वाहतूक शाखेने महामार्गवरून फाटे फुटणाऱ्या चौकांतही याबाबत सूचना फलक लावून वाहनचालक व नागरिकांची होणारी संभाव्य गैरसोय टाळावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: manjari railwaygate close