Maratha Kranti Morcha : उद्यापासून चक्री उपोषण

Maratha Kranti Morcha
Maratha Kranti Morcha

पुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे पुण्यात सोमवारी (ता. २०) पासून बेमुदत चक्री उपोषण करण्यात येणार आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर (कौन्सिल हॉल) दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे उपोषण होणार आहे. शांततेच्या मार्गाने आणि अहिंसक पद्धतीने हे आंदोलन करणार असल्याचे मोर्चाच्या समन्वयकांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

रस्त्यावर कोणतेही आंदोलन न करण्याचा निर्णय मोर्चाने घेतला होता. याचा एक भाग म्हणून जिल्हा व तालुकास्तरावर चक्री उपोषण करणार आहे. समन्वयकांची बैठक औरंगाबाद येथे झाली होती. त्यात हा निर्णय घेतल्याचे मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी सांगितले. यापुढील दिशा ठरविण्यासाठी राज्य समन्वय समितीची बैठक औरंगाबाद येथे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी बाळासाहेब अमराळे, सचिन आडेकर, किशोर मोरे व अनिल पारगे उपस्थित होते. 

कुंजीर म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना मदत आणि त्यांना सरकारी नोकरी मिळावी, अशा मागण्या आम्ही करीत आहोत. मुख्यमंत्र्यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी कालावधी ठरवून, त्यासाठी पुढे काय करणार, हे लेखी आश्‍वासन द्यावे आणि त्याची अंमलबजावणी करावी.’’

गुन्हे मागे घ्यावेत
नऊ ऑगस्टला झालेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोडफोडीची घटना असो वा शहरात ठिकठिकाणी झालेल्या घटनांमध्ये अनेक जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यातील काही जणांना जामीन मंजूर झाला असून, काहींना मिळायचा आहे. यात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत. आंदोलनात बाह्यशक्तींनी धुडगूस घातला होता. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शांताराम कुंजीर यांनी केली आहे.

आंदोलनात आचारसंहिता फलक
आगामी आंदोलनांसाठी खास आचारसंहिता तयार केली आहे. त्याचे फलक लावूनच आंदोलने केली जातील. ज्यांना शांततेने आंदोलन करायचे आहे, त्यांनीच यात सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वयकांनी केले आहे.

जखमी मुलीला मदत देऊ
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मालमत्तेचे ठिय्या आंदोलनादरम्यान नुकसान झाले. त्यामुळे तेथे काच बसवून दिली आहे. पौड रस्ता येथे अश्रुधुराच्या नळकांडीचा मार बसल्याने एक मुलगी जखमी झाली होती. तिलाही मदत देणार असल्याचे कुंजीर यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com