दुचाकी रॅलीला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मिलिंद संगई
रविवार, 6 ऑगस्ट 2017

मुंबईत होणा-या मराठा क्रांती महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीत दुचाकी रॅलीचे आयोजन केले गेले. या रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला. यात युवक युवतींसह हजारो लोक सहभागी झाले होते.

बारामती: मुंबईत होणा-या मराठा क्रांती महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीत दुचाकी रॅलीचे आयोजन केले गेले. या रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला. यात युवक युवतींसह हजारो लोक सहभागी झाले होते.

बारामती तालुक्याच्या सहा जिल्हा परिषद गटातून दुचाकी रॅली बारामतीतील रेल्वे ग्राऊंड मैदानावर आली. तेथून ही रॅली भिगवण चौक मार्गे कसब्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पुन्हा गुनवडीचौक, गांधी चौक मार्गे भिगवण चौकातून पेन्सिल चौकापर्यंत गेली. तेथून भिगवण रस्त्यावरील जिजाऊ भवन येथे या रॅलीचा समारोप झाला. 

दरम्यान शनिवारी जिजाऊ भवन येथे झालेल्या बैठकीत मुंबईला होणा-या महामोर्चासाठी मोठ्या संख्येने जाण्याचे नियोजन करण्यात आले. या मोर्चादरम्यान जी शिस्त पाळायची आहे त्या बाबतही या बैठकीत चर्चा केली गेली. या व्यतिरिक्त प्रमुख कार्यकर्त्यांनी मार्ग व इतर बाबींचीही चर्चा केली. बारामती शहर व तालुक्यातून या मोर्चासाठी अधिकाधिक मराठा बांधवांनी जाण्याच्या दृष्टीने सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे.