मराठी चित्रपटांसाठी सरसावले महामंडळ अन्‌ ‘इम्पा’ !

मराठी चित्रपटांसाठी सरसावले महामंडळ अन्‌ ‘इम्पा’ !

पुणे - एकीकडे ‘बाहुबली’सारख्या चित्रपटांवर प्रेक्षकांच्या अक्षरशः उड्या पडताना पाहायला मिळताहेत. हाउसफुलचे बोर्ड झळकताहेत... आणि दुसरीकडे मराठीतले वेगळ्या वाटेवरचे प्रयोग म्हणून नावाजले गेलेले, अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत मराठी पताका फडकावून आलेले, अगदी राष्ट्रीय पुरस्कारही मिळवलेले दर्जेदार चित्रपट मात्र ‘वितरक नाहीत’ म्हणून प्रदर्शितच होऊ शकत नाहीयेत. गेली बरीच वर्षं असणारं हे बोचरं वास्तव आता मात्र बदलण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत...

मराठीतल्या दर्जेदार चित्रपटांना प्रेक्षकांपर्यंत पोचता यावं, यासाठी आता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि इंडियन मोशन पिक्‍चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन (इम्पा) यांसारख्या संघटनांनी पुढाकार घेतला आहे. गुणवत्तेच्या आधारावर उच्च दर्जाचे असूनही केवळ आर्थिक गणितांमुळे किंवा वितरक न मिळू शकल्यामुळे निव्वळ महोत्सवांतील ‘स्क्रीनिंग’पुरतेच आणि वृत्तपत्रांतील बातम्यांपुरतेच मर्यादित राहणाऱ्या अनेक चित्रपटांना यामुळे आता नवसंजीवनीच मिळू शकणार आहे.

या चित्रपटांना आपल्या माध्यमातून या संघटना केवळ वितरकच मिळवून देणार नाहीत, तर चित्रपट प्रत्यक्ष प्रदर्शित होईपर्यंत पूर्वप्रसिद्धी (प्रमोशन), जाहिराती अशी आवश्‍यक ती सर्व प्रकारची मदतही त्यांच्याकडून निर्माते-दिग्दर्शकांना केली जाणार आहे. यामुळे अनेक नवनिर्मात्यांचे चित्रपट थिएटरमध्ये पोचण्यासोबतच मराठी चित्रपटांच्या प्रेक्षकांना ही दर्जेदार मेजवानीही मिळणे शक्‍य होणार आहे.

दरम्यान, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह अनेक महोत्सवांत गाजलेला ‘लेथ जोशी’ हा यांत्रिकीकरणासारख्या महत्त्वाच्या विषयावरचा चित्रपट महाराष्ट्रदिनी नीलायम चित्रपटगृहात सकाळी ९ वाजता दाखवला जाणार आहे. हा चित्रपटही अद्याप आर्थिक गणिते न जुळू शकल्याने प्रदर्शित होऊ शकलेला नाही. त्याचे दिग्दर्शक मंगेश जोशी म्हणाले, ‘‘ ही योजना स्तुत्यच आहे. याचा अनेक निर्मात्यांना फायदाच होईल. मात्र, चांगले चित्रपट चालणे ही आपल्याकडील प्रत्येकाचीच जबाबदारी म्हणून पाहिली गेली पाहिजे. विशेषतः प्रेक्षकांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. त्यांनी मराठी चित्रपट हे पहिल्या आठवड्यातच चित्रपटगृहांत जाऊन पाहायला हवेत. चित्रपट टिकणे हे आपल्या सांस्कृतिक वाढीसाठी ेगरजेचे आहे.’’

चित्रपट निर्मात्यांना त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यात मदत करण्यासाठी महामंडळाने अनेक वितरक आणि कंपन्यांशी संपर्क साधला आहे. त्यांच्यासोबत निर्मात्यांची भेट घालून दिली जाईल. त्यातून प्रदर्शनावेळी आर्थिक मदतही मिळू शकेल. याचसोबत, ‘प्रेक्षक-जल्लोश’ ही प्रेक्षकांसाठीची सभासदत्व योजना आम्ही सुरू केली आहे. हे सभासदत्व विनामूल्य असून, महामंडळातर्फे या प्रेक्षकांपर्यंत निर्मात्यांना पोचवून त्यांचे चित्रपटही दाखवले जातील.  

- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

निर्मात्यांना वितरक आणि रिलीज पार्टनर मिळवून देण्यासाठी इम्पाच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ मराठी निर्मात्यांनी घ्यायला हवा. मात्र, अनेकदा निर्मातेच याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. सुविधा असूनही त्यांचा लाभ न घेतल्यामुळेही अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यात अडचण येते, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. 
- विकास पाटील, संचालक, इम्पा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com