देशाचे प्रतिनिधित्व ही अभिमानाची गोष्ट

देशाचे प्रतिनिधित्व ही अभिमानाची गोष्ट

आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या यशाविषयी?
खरंच या पुरस्कारामुळे खूपच आनंद झाला आहे. या महोत्सवात एका अफगाणी चित्रपटातील कलाकाराला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर मला अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून देशाच्या यशात योगदान देणे, ही माझ्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. 

‘गाँव’ या चित्रपटाविषयी?
या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम सिंग यांनी केले आहे. एका छोट्या गावातील आयुष्य, कला, संस्कृती जोपासताना अचानक कोणीतरी येऊन गावाचे शहरीकरण करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, गावकरी त्याला कशाप्रकारे प्रतिसाद देतात आणि गावातील छान गोष्टी कशाप्रकारे मागे राहतात, याविषयी सुंदर विचार मांडणारा हा चित्रपट आहे. अनेक महोत्सवात हा चित्रपट दाखविण्याचा प्रयत्न आहे. 

या चित्रपटातील तुझी भूमिका?
गाँव या चित्रपटात माझे नाव ‘सांगो’ आहे. अत्यंत कलात्मक आणि बिनधास्त अशी ही भूमिका आहे. ‘‘ये मर्द, औरत, छोटे, बडे ये सब अंग्रेजी चोचले है, इस गाँव मे सब बराबर है,’’ या वाक्‍यातून शहरीकरणाबाबतची तिची वेगळी दृष्टी व्यक्त होते. 

हिंदी आणि मराठी चित्रपटांमधील फरक ?
चित्रपट हिंदी असो वा मराठी त्यात फक्त बजेटचा फरक असतो. मराठी आणि हिंदी भाषा या दोन्ही मनाच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे भाषेचा विशेष फरक वाटत नाही. पण, जर चित्रपटाची टीम कमी असेल, तर ते एकत्रित परिवारासारखे राहतात. मात्र, मोठी टीम असेल, तर कलाकाराला व्हॅनिटीमध्येच बसावे लागते. त्यामुळे वातावरणाचा  फरक जाणवतो. 

चित्रपट प्रमोशनविषयी तुझं मत काय?
मला वाटते, की महोत्सवात सहभागी होऊन पुरस्कार मिळवणे, हीच प्रमोशनची सर्वांत मोठी पायरी आहे. पैसे किंवा होर्डिंग लावून प्रमोशन करण्यापेक्षा त्या चित्रपटाविषयी बोलणे, प्रेक्षकांपर्यंत पोचून त्यांच्यात तो चित्रपट बघण्याची इच्छा निर्माण करणे, ही गोष्ट जास्त आवडते. ‘गाँव’च्या प्रदर्शनाची तारीख ठरेल, त्या वेळी वेगवेगळ्या  पद्धतीने प्रमोशन करून हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

‘न्यूड’ चित्रपटावरून खूप वाद  झाले, त्याविषयी?
या गोष्टीचे फार वाईट वाटते. विशेषत- चित्रपट महोत्सवामध्ये दिग्दर्शकाला त्याची कलाकृती मांडण्याचा पूर्ण अधिकार  असावा. आस्था असलेलेच प्रेक्षक पैसे आणि पास काढून महोत्सवात चित्रपट पाहायला येतात. सेन्सॉर प्रमाणपत्र मिळवून चित्रपट प्रदर्शित होतात. चित्रपटाच्या माध्यमातून जे सांगायचे, म्हणायचे, तसेच चित्रपटाचे काय नाव ठेवायचे, याचा अधिकार दिग्दर्शकाला आहे. त्यावर बंदी आणू शकत नाही. 

तुझे आगामी चित्रपट कोणते?
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वाडा’ या चित्रपटाचे माझ्यावरील चित्रीकरण पूर्ण झाले आहे. तो कधी प्रदर्शित होईल, याची कल्पना नाही. तसेच, आणखी एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून, त्याचे नाव ‘लगोरी’ असे आहे. त्याचबरोबर मार्च आणि एप्रिल महिन्यातही मी चित्रीकरणात व्यग्र असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com