महापालिकेत भाजपचा प्रस्ताव नामंजूर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

पुणे - महापालिकेच्या हद्दीबाहेरील मांगडेवाडी, भिलारेवाडी आणि गुजर-निंबाळकरवाडी या गावांमध्ये सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज) टाकण्याच्या कामासाठी दहा कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे देण्याचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सदस्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी नामंजूर झाला. महापालिकेत बहुमत आणि शिवसेनेची साथ मिळूनही सत्ताधाऱ्यांना त्यात अपयश आले. सभागृहात 81 सदस्य अपेक्षित असताना केवळ 74 सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोधात मतदान केले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस तटस्थ राहिली. 

पुणे - महापालिकेच्या हद्दीबाहेरील मांगडेवाडी, भिलारेवाडी आणि गुजर-निंबाळकरवाडी या गावांमध्ये सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज) टाकण्याच्या कामासाठी दहा कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे देण्याचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सदस्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी नामंजूर झाला. महापालिकेत बहुमत आणि शिवसेनेची साथ मिळूनही सत्ताधाऱ्यांना त्यात अपयश आले. सभागृहात 81 सदस्य अपेक्षित असताना केवळ 74 सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोधात मतदान केले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस तटस्थ राहिली. 

दरम्यान, हद्दीबाहेरच्या कामांसाठी सभागृहातील एकूण सदस्य संख्येपैकी निम्म्या सदस्यांचा पाठिंबा आवश्‍यक असतो. सभागृहात तेवढी उपस्थित नसल्याने हा प्रस्ताव असंमत करण्यात आल्याचे प्रशासनाने मतदानानंतर जाहीर केले. 

या तिन्ही गावांमध्ये सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा नसल्याने येथील मैलापाणी कात्रज गावालगतच्या तलावात येत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर या गावांमध्ये महापालिकेच्या वतीने सांडपाणी वाहिन्या विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी दहा कोटी रुपये वर्गीकरणाद्वारे देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत आला होता. त्यावर चर्चाही झाली; पण "हे करीत असताना येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, उद्यान, राष्ट्रध्वज, पाटीलवाडा, फुलराणी यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी पैसे दिले जात नाहीत. देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून वाहिन्यांसाठी निधी देणे योग्य नाही. संबंधित ग्रामपंचायतींचे उत्पन्न चांगले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनीही हा खर्च उचलावा, अशी भूमिका सदस्यांनी मांडली. महापालिकेत आलेल्या गावांसाठी निधी पुरविण्याची गरज असताना या गावांना निधी देताना विचार व्हावा, अशी मागणीही झाली. या कामासाठी आपल्या पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचे सांगून भाजप व शिवसेनेच्या सदस्यांनी भाषणेही केली. 

त्यानंतर प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी विनंती सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी केली. मात्र, "मनसे'चे वसंत मोरे यांनी विरोध केला. त्यामुळे मतदान घेण्यात आले. त्यात, प्रस्तावाच्या बाजूने 74, तर विरोधात एका सदस्याचे मतदान झाले. हद्दीबाहेरील कामांसाठी नियमानुसार 50 टक्के सदस्यांचा पाठिंबा गरजेचे असल्याचे नगरसचिव सुनील पारखी यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र, सभागृहात 74 सदस्य असल्याचा मतदानाच्या आकडेवरून स्पष्ट आहे. 

मोरे- भिमाले यांच्यात खडाजंगी 
हुतात्मा सौरभ फराटे यांचे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावावरून भिमाले आणि मोरे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. फराटे यांच्या स्मारकाचा प्रस्ताव पुढे घेण्याची मागणी राष्ट्रवादी करीत असल्याचे भिमाले यांनी सांगितले. त्यावर तुपे बोलत असताना मोरे यांनी भिमाले यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. ""गटनेत्यांच्या बैठकीतील भाषा येथे सांगायची का''?, अशी विचारणा मोरे यांनी केली. तेव्हा संतप्त झालेले भिमाले यांनी ""दोन सदस्य असलेल्यांनी आम्हाला शिकवू नये,'' अशा शब्दांत भिमाले यांनी मोरे यांचा समाचार घेतला. त्यावरून दोघांमधील वाद वाढला. सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांनी मध्यस्थी करून दोघांना शांत केले. 

बालेवाडीतील टाकी पाडणार 
जंगली महाराज रस्त्यावर नुकतेच पदपथाचे काम झाले असतानाही त्याची खोदाई करून सांडपाणी वाहिनीचे काम केल्याची बाब नीलिमा खाडे यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिली. सांडपाणी वाहिन्यांच्या कामासाठी संबंधित खात्याची परवानगी नसून, नव्याने केलेला पदपथ उखडल्याने महापालिकेचे नुकसान झाल्याचे खाडे यांनी सांगितले. त्यावर पथविभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी खुलासा केला; पण तो समाधानकारक नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. त्यावर रस्त्यावरील कामे आणि अन्य समस्यांबाबत येत्या दोन फेब्रुवारीला बैठक घेण्यात येईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. तीत, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित राहणार असून, कामांसंदर्भात योग्य त्या सूचना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बालेवाडी येथील धोकादायक झालेली पाण्याची टाकी महिनाभरात पाडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

बेकायदा बांधकामांवर कारवाई 
वारजे परिसरात बेकायदा बांधकामाचा मुद्दा उपस्थित करून काही भागात भराव टाकून, बांधकामे केली आहेत. व्यावसायिक कारणांसाठी या बांधकामाचा वापर होत असल्याचे वृषाली चौधरी यांनी सभागृहात सांगितले. याबाबत तातडीने पाहणी करून संबंधित बांधकाम आणि तेथील व्यावसायिकांवर कारवाई करण्याची सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला केली. पाहणी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता अमर शिंदे यांनी सांगितले. 

Web Title: marathi news BJP proposal rejected PMC pune