‘बीएमसीसी’ची फिरोदिया करंडकावर मोहोर

‘बीएमसीसी’ची फिरोदिया करंडकावर मोहोर

पुणे - अभियांत्रिकी महाविद्यालयांची एका दशकाची फिरोदिया करंडकरावरची मक्तेदारी संपवत बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) ‘इतिहास गवाह है’ या एकांकिकेने ‘फिरोदिया करंडक स्पर्धे’च्या अंतिम फेरीत आपली मोहोर उमटवत नवा इतिहास रचला. विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी (किबो) आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालय (सरयल) या संघांच्या एकांकिकांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान मिळवले. 

फिरोदिया करंडक म्हणजे अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या उत्तम तांत्रिक कौशल्यांचा समावेश असणाऱ्या एकांकिका ही दहा वर्षांची परंपरा मोडत, उत्तम संहिता आणि ताकदीचा अभिनय या जोरावर बीएमसीसीच्या संघाने या वर्षीचा करंडक जिंकला. दिग्दर्शन आणि लेखन या विभागांमध्येही या संघाने बाजी मारली. अभिनयासोबतच महाविद्यालयीन तरुणाईच्या कलाविष्काराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेची अंतिम फेरी सोमवारी (ता. २६ ) संपली. अंतिम फेरीत सहभागी नऊ संघांचे परीक्षण चिन्मय मांडलेकर, सुमीत राघवन, कविता लाड, संजय जाधव व मधुरा वेलणकर यांनी केले. 

फिरोदिया करंडक विजेत्या संघाच्या सादरीकरणाबद्दल स्पर्धेचे संयोजक अजिंक्‍य कुलकर्णी म्हणाले,‘‘फिरोदिया करंडक म्हणजे फक्त ‘टेक्‍निकल इव्हेंट’ हे समीकरण बीएमसीसीच्या एकांकिकेने बदलले. पात्रता आणि प्राथमिक फेरीत सहभागी होणाऱ्या संघांनी एकांकिकेच्या कथानक व संहितेवर अधिक लक्ष द्यावे, हीच संयोजक म्हणून आमची भूमिका असते. तांत्रिक कौशल्यांचा वापर हा एकांकिकेला साजेसा आणि योग्य तितकाच असणे गरजेचे आहे. कथेला अनुरूप इव्हेंट्‌सजर एकांकिकेत गुंफले तर ते सादरीकरणाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात, याचे उत्तम उदाहरण या वर्षी करंडक विजेती एकांकिका ठरली. कथा, अभिनय, दिग्दर्शन, संगीत अशा सर्वच पातळ्यांवर ‘इतिहास गवाह है’ ही एकांकिका सरस ठरली.’’

वैयक्तिक पारितोषिके मिळालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे ः लेखक ः चिन्मय देव, शुभम गिजे (बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय), तन्मय जगताप (विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी), ऋत्विक व्यास, अभिषेक रानडे (सर परशुरामभाऊ महाविद्यालय). 

दिग्दर्शन ः ऋषी मनोहर (बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय), आदित्य शेवतेकर (विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी), ऋत्विक व्यास, अभिषेक रानडे (सर परशुरामभाऊ महाविद्यालय)

अठ्ठावीस वर्षांची प्रतीक्षा संपली
बीएमसीसी महाविद्यालयाचा संघ गेल्या पाच वर्षांपासून अंतिम फेरीसाठी पात्र ठरत होता. मात्र, या संघांचे करंडकाचे स्वप्न अपुरेच राहिले होते. ‘सिनेमॅटिक लिबर्टी’वर आधारित एकांकिकेने अठ्ठावीस वर्षांनंतर या महाविद्यालयाला फिरोदिया करंडकाच्या जेतेपणाचा मान मिळवून दिला. सहज गप्पा मारताना सुचलेली गोष्ट रंगमंचावर उभी कशी करायची, याची कोणतीही कल्पना नसताना या संघाने एकांकिकेवर काम करायला सुरवात केली आणि अंतिम फेरीच्या सादरीकरणानंतर सभागृहातील प्रत्येकाने उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात या एकांकिकेला दाद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com