सरकारमध्ये राहायचं की नाही?; राजू शेट्टी यांचा निर्णय 26 जुलैला

उमेश शेळके
बुधवार, 28 जून 2017

देशभरात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून रान उठविण्याची तयारी राजू शेट्टी यांनी चालविली आहे. राजू शेट्टी-सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. याच पार्श्‍वभूमीवर शेट्टी यांनी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकारिणीची आज तातडीने बैठक बोलाविली होती. याच बैठकीत सदाभाऊ यांच्या हकालपट्टीचा निर्णय होण्याचीही शक्‍यता होती. 

पुणे : 'आमची वैचारिक घुसमट होत आहे. आम्ही 25 जुलैपर्यंतच सरकारबरोबर आहोत. 26 जुलैला जो काही निर्णय होईल, तो आरपार असेल,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज (मंगळवार) दिला. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातील ताणलेल्या संबंधांचे पडसादही स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत उमटले. 

शेतकरी संपानंतर राज्य सरकारने 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची योजना जाहीर केली. मात्र, यातील तरतुदी पुरेशा नसल्याचे मत शेट्टी यांनी व्यक्त केले. नियमित कर्ज भरणाऱ्यांना किमान 50 हजार रुपये मिळाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, 'स्वामिनाथन आयोग हेच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरील उत्तर आहे' असा दावाही त्यांनी केला. 

देशभरात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून रान उठविण्याची तयारी राजू शेट्टी यांनी चालविली आहे. राजू शेट्टी-सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. याच पार्श्‍वभूमीवर शेट्टी यांनी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकारिणीची आज तातडीने बैठक बोलाविली होती. याच बैठकीत सदाभाऊ यांच्या हकालपट्टीचा निर्णय होण्याचीही शक्‍यता होती. 

राजू शेट्टी म्हणाले.. 

  • शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे आम्ही लक्ष देऊ 
  • 'संसदेच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करणार आहात की नाही' असा प्रश्‍न 18 जुलैला सर्व खासदारांना विचारणार 
  • कर्जमाफी योजनेच्या 34 हजार कोटी रुपयांची आकडेवारी सरकारने जाहीर करावी; या आकडेवारीमध्ये तफावत आहे 
  • राज्य सरकारने आम्हाला फसविले 
  • संघटनेची भूमिका आणि सदाभाऊ खोत यांची भूमिका यात फरक आहे 
  • पक्षाची भूमिका हीच मंत्र्यांची भूमिका असली पाहिजे 
  • सदाभाऊ खोत यांना बोलावून घेत जाब विचारणार आहोत; त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधीही दिली जाईल 
  • सदाभाऊ खोत संघटनेच्या कुठल्याही पदावर नाहीत 
  • 4 जुलैनंतर सदाभाऊ यांच्याविषयी निर्णय घेणार