बारावीची परीक्षा सुरू

बारावीची परीक्षा सुरू

पुणे - अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पुस्तके, नोट्‌स, वह्यांची पाने चाळत अभ्यासाची उजळणी करण्यात मग्न असणारे विद्यार्थी, ‘टेन्शन घेऊ नकोस, पेपर नीट लिही’, असा सल्ला वजा आधार देणारे पालक, परीक्षा केंद्रावर प्रवेशद्वारात विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प देणारे परीक्षा केंद्रप्रमुख, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील अधिकारी, शिक्षक असे चित्र बुधवारी दिसून आले.

बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर औक्षण करून गुलाबपुष्प देण्यात आले. घरोघरी मुलांच्या हातावर दही-साखर ठेवून ‘नीट पेपर सोडव’, ‘जास्त टेन्शन घेऊन नको, जेवढे लिहिता येईल तेवढे लिही’ असे सल्ला काळजीपोटी आई-बाबा, ताई-दादा तसेच घरातली मंडळी देत होती. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात होते. मुलांच्या मनावरील परीक्षेचे दडपण कमी व्हावे, यासाठीही परीक्षा केंद्रावर मार्गदर्शन करण्यात येत होते.

बारावीच्या परीक्षेचा पहिला दिवस आणि त्यात शहरातील विविध कार्यक्रम, त्याला हजेरी लावणारे मंत्री, राजकीय नेते अशा ‘व्हीआयपीं’ची उपस्थिती; परिणामी वाहतुकीवर येणारा ताण लक्षात घेता आपल्या मुलांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी नियोजित वेळेआधीच एक तास निघालो, अशा प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केल्या. मुलांची बारावीची परीक्षा असल्यामुळे काही पालकांनी खास रजाही काढल्याचे सांगितले. पेपर होईपर्यंत पालक परीक्षा केंद्राबाहेर थांबल्याचे दिसून आले. परीक्षेदरम्यान ‘कॉपी’ आणि पेपरफुटीचे प्रकार होऊ नयेत, म्हणून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कडक बंदोबस्त ठेवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com