कात्रजला खाद्य महोत्सवात एक कोटीची उलाढाल

कात्रजला खाद्य महोत्सवात एक कोटीची उलाढाल

कात्रज - महिला बचत गट आणि महिला उद्योजिकांनी बनवलेल्या ग्रामीण पदार्थांना बाजारपेठ आणि शहरातील नागरिकांसाठी पर्वणी ठरणारा यशस्विनी अभियान आयोजित गावरान खाद्य महोत्सव कात्रज, भारती विद्यापीठ परिसर व आंबेगावातील नागरिकांसाठी अस्सल मेजवानीचा ठरला. या खाद्य महोत्सवाला तब्बल तीस हजार खवय्यांनी भेट दिल्यामुळे सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाली.

भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, कात्रज, सिंहगड सस्ता परिसर व वारजे येथील पन्नास बजत गटांनी आपले खाद्यपदार्थ सादर केले होते. वडगाव बुद्रुक व वारजे नंतर आयोजित तिसरा खाद्यमहोत्सव कात्रज, धनकवडी, भारती विद्यापीठ परिसर आणि आंबेगावकरांसाठी पर्वणी ठरला. या खाद्यमहोत्सवात बचत गटांची एक कोटींची उलाढाल झाली. पारंपरिक पदार्थांची लज्जत कोणत्याही स्टार हॉटेलमधील पदार्थांत सापडत नाही, अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या. असे उपक्रम बचत गट आणि महिला उद्योजकांचे मनोधैर्य वाढवणारे आहेत, असे मत वर्षा घाडगे यांनी व्यक्त केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून ठिकठिकाणी भरवला जाणारा हा खाद्यमहोत्सव महिला सक्षमीकरणाचा उद्देश सफल करणारा उपक्रम असल्याचे मत नंदीनी सुर्यवंशी यांनी व्यक्त केली. या महोत्सवाचे उद्‌घाटन रजनी इंदूलकर यांच्या हस्ते झाले होते. या वेळी माजी महापौर व विद्यमान नगरसेवक दत्तात्रय धनकवडे. माजी नगरसेवक अप्पा रेणुसे, नगरसेवक विशाल तांबे, युवराज बेलदरे, स्मिता कोंढरे, अमृता बाबर, अश्विनी भागवत, महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा रूपाली चाकणकर, संतोष फरांदे उपस्थित होते.

पुरणपोळीपासून चुलीवरच्या मटणापर्यंत... 
या महोत्सवात उकडीचे मोदक, पुरण पोळी, पिठलं भाकरी, भरलेली वांगी, ठेचा, मांडे, पुडाच्या वड्या, मासवडी, शिंगोळ्या, हुलग्याचे माडगे असा शाकाहारी बेत होता. मालवणी, विदर्भ सावजी, नागपुरी, कोल्हापुरी तांबडा व पांढरा रस्सा, गावरान तुपातील चिकन, मटण, मटका बिर्याणी, चुलीवरचं मटण अशा शेकडो प्रकारच्या मांसाहारी पदार्थांचा पोटोबा करण्यासाठी तीन दिवस गर्दी उसळली होती. अवघ्या महाराष्ट्रातील लज्जतदार पदार्थांचे संमेलनच भारती विद्यापीठ परिसरातील महापालिका शाळेच्या मैदानावर भरले होते. शिक्षणासाठी विविध राज्यांतून आलेले आणि भारती विद्यापीठ परिसरात वास्तव्यासाठी असलेले महाविद्यालयीन विद्यार्थी गावरान पदार्थावर अक्षरश: तुटुन पडले होते. परिसरातील महिलांनी विविध पदार्थांचा आस्वाद घेतानाच विविध पाककृतींची माहिती घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com