परिसरात उदंड झाले 'पोस्टर बॉईज' ; महापालिकेचे बुडतेय लाखोंचे उत्पन्न

poster
poster

हडपसर : वाढदिवसापासून ते दशक्रिया विधीपर्यंतचा कोणताही सोहळा फ्लेक्सबाजी केल्याखेरीज पार पडत नसल्याचे चित्र हडपसर परिसरात पाहायला मिळत आहे. फुकट्या 'पोस्टर बॉईज'मुळे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे लाखोंचे उत्पन्न बुडत आहे. राजकीय पुढाऱयांपुढे प्रशासनाने लोटांगण घातल्याने 'पोस्टर बॉईज'ला आवर घालणे अशक्य झाले आहे. 

सर्वाधिक फ्लेक्सबाजीचा महापूर गाडीतळ, गांधी चौक, वेस परिसरात आला आहे. येथील उद्योग आणि अर्थक्षेत्राची जशी वाढ होत गेली तशी जाहिरात क्षेत्राचीही झाली. याचा परिणाम रस्त्यांवरच्या पोस्टर, होर्डिंगच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हडपसर व फ्लेक्सबाजी हे समीकरण बनले आहे. रस्ते, चौक, इमारती, उड्डाणपूल, बस थांबे, विजेचे खांब, एवढेच नव्हे, तर झाडांनादेखील खिळे ठोकून अनधिकृतपणे जाहिरातबाजी केली जात आहे.

परिसरातील राजकीय नेत्यांचे वाढदिवसाला होणारी फ्लेक्सबाजी चर्चेचा विषय ठरते. विशेष म्हणजे वाढदिवस तसेच कार्यक्रमासंदर्भात लावलेले फ्लेक्स अनेक महिने काढले जात नाही. उन्ह, वारा, पावसाने हे फ्लेक्स कुजून, फाटून जातात. मात्र, ते उतरवले जात नसल्याने विद्रुपीकरण वाढत आहे. 

पंधरा नंबर चौक, गाडीतळ चौक, सासवड रस्ता, मगरपट्टा रस्ता, ससाणेनगर रस्ता हे फ्लेक्सबाजीचे हॉटस्पॉट ठरत आहेत. सर्वच बस थांबे अनधिकृत जाहिरातबाजीचा अड्डा बनले आहेत. नव्याने उभारण्यात आलेल्या काही बस स्थानकांवर संबंधित बस स्थानकावरून ये-जा करणाऱ्या बसेसचे वेळापत्रक लावले आहे. त्यावर बसची वेळही नमूद असते. मात्र, वेळापत्रकावरदेखील जाहिराती चिकटविल्या आहेत. बसचे वेळापत्रक समजत नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत आहे.

नेते मंडळीकडून त्यामुळे महापालिका प्रशासन कारवाईला धजावत नाही. फ्लेक्सवर कारवाई म्हटले की, ''नको रे बाबा', अशी प्रतिक्रिया अतिक्रमण पथकाची असते. राजकीय वरदहस्तामुळे भोसरी परिसरात फ्लेक्सबाजी वाढल्याची चर्चा आहे. 

महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागामार्फत जाहिरात कर, परवाना शुल्क आणि महापालिका जागेत जाहिरात फलक असल्यास जागा भाडे आकारणी करून परवाना दिला जातो. महापालिकेच्या जागेवरील आणि खासगी जागेतील अशा दोन प्रकारे महापालिकेला जाहिरात कर प्राप्त होते. महापालिका आकारत असलेले दर पुणे व मुंबई तसेच अन्य शहरातील दरांच्या तुलनेने अत्यंत कमी आहेत.

दर कमी असूनही फुकट्या 'पोस्टर बॉईज'मुळे महापालिकेचे उत्पन्न बुडीत खात्यात जमा होत आहे. परिसरात लग्न, मुंजीचेही फ्लेक्स लावण्याचा 'ट्रेंड' वाढला आहे. वधू-वरांचे, छायाचित्रासह लग्नपत्रिकाच फ्लेक्सवर छापली जात आहे. लहान मुलांच्या वाढदिवसाचे फ्लेक्सही सर्रास लावले जातात. महापालिकेकडून अशा एकाही फ्लेक्सवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com