तरुणाईने घेतला उद्योजक बनण्याचा धडा! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

बारामती : 'सृजन उद्योजकता व कौशल्य विकास' अभियानांतर्गत शारदानगर (ता. बारामती) येथील अप्पासाहेब पवार सभागृहात आयोजित कार्यक्रमात उद्योजक बनण्याचा ध्यास घेऊन आलेल्या तरुणांनी गर्दी केली होती. वडापावच्या गाड्यावरील कामगार ते उद्योजक, शेतकरी ते शेतीपूरक व्यावसायिक आदींसह बारामतीतील उद्योजकांनी त्यांची वाटचाल उलगडली. उद्योजक बनण्यासाठी फक्त आर्थिकच पाठबळ लागते असे नाही, तर आत्मविश्वास आणि जिद्दीचे पंखही पुरेसे ठरतात, याचा धडा तरुणांना मिळाला! 

जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या संकल्पनेतून शनिवारी शारदानगर येथे 'सृजन उद्योजकता व कौशल्य विकास' अभियानाची सुरवात झाली. या अभियानाच्या सुरवातीलाच बारामतीतील दोन हजारहून अधिक युवक-युवती सहभागी झाले. या कार्यक्रमातील प्रकट मुलाखतीत बारामतीत पेंटिंगचे काम करता करता नावारूपाला आलेल्या दीपक आर्टचे संचालक दीपक बनकर यांनी त्यांचा जीवनप्रवास उलगडला. प्रतिकूल स्थितीत बी.कॉम पदवी घेतली. बोर्ड रंगविण्याची छोटी कामे करत-करत बारामतीत डिझाईनच्या कामाची कमतरता असल्याचे लक्षात आले आणि एका छोट्या दुकानात झालेली सुरवात अनेक टक्केटोणपे खाल्ल्यानंतर दीपक आर्टच्या नावाने नावारूपाला आली, आज 50 कर्मचारी हाताशी आहेत आणि लाखोंची उलाढालही करतो आहे, असे त्यांनी सांगितल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. 

उद्योजक धनंजय जामदार म्हणाले, ''शेतीत एकाच भावाने थांबायचे आणि बाकीच्यांनी व्यवसायात उतरायचे ठरविले. आज उद्योजकतेचा मोठा पल्ला गाठला आहे, आज पद्मश्री अप्पासाहेब पवार नसले तरी त्यांचे नातू रोहित पवार हे तेच काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचे काम करीत आहेत. त्या प्रतिकूल परिस्थितीत माझ्यासारखे चार उद्योजक घडले, आता चारशे घडतील, अशी परिस्थिती आहे.'' 

बीएस्सी ऍग्रीची पदवी घेऊन शेतीत शेती आणि शेतीपूरक व्यवसायात यश मिळविलेले निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील कृषिनिष्ठ शेतकरी संतोष राऊत, अजिंक्‍य मांढरे, अभिषेक ढवाण आदींच्या ज्ञानेश्वर जगताप यांनी घेतलेल्या मुलाखती उपस्थित युवकांच्या मनावर उद्योजकतेचा ठसा उमटवून गेल्या. 

'माझ्यातील बेरोजगाराचा कायापालट झाला' 
उद्योजक धनंजय जामदार म्हणाले, ''सुमारे 25 वर्षांपूर्वी अप्पासाहेबांनी परदेशात नेऊन आणले. तेथील उद्योग दाखविले आणि पाठबळ दिले, तेव्हाच माझ्यातील बेरोजगाराचा कायापालट झाला आणि उद्योजक बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आज अप्पासाहेबांचे नातू रोहित पवार त्याच्या पुढचा पल्ला गाठून हजारो जणांना उद्योजक बनविण्याचे स्वप्न पाहत आहेत, हे खूप महत्त्वाचे आहे.''