भामा आसखेड धरणातून नदीत पाणी सोडणे बंद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

आंबेठाण : खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे भामा आसखेड धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. आजअखेर धरणात 90.73 टक्के पाणीसाठा (6.95 टीएमसी) आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता 8.14 टीएमसी आहे. 

आंबेठाण : खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे भामा आसखेड धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. आजअखेर धरणात 90.73 टक्के पाणीसाठा (6.95 टीएमसी) आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता 8.14 टीएमसी आहे. 

भामा आसखेड धरणातून सांडव्याद्वारे भामा नदीपात्रात सोडण्यात आलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे. आतापर्यंत धरण साखळीत 832 मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती भामा आसखेड प्रकल्प सिंचन व्यवस्थापन विभागाचे शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली. मागच्या वर्षी याच तारखेपर्यंत 574 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद होती. 
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 20-22 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. धरणात जमा होणारा मोठा पाणीसाठा पाहता खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून जास्तीत जास्त 6488 क्‍युसेक पाणी चारही दरवाजांतून सोडण्यात येत होते; परंतु मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. 

सध्या पश्‍चिम डोंगराळ भागात अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत. त्यामुळेदेखील धरणात पाणीसाठा वाढण्यास मदत होत आहे. एक जूनपासून धरण क्षेत्रात 832 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौंड या तीन तालुक्‍यांना होत असतो. त्यामुळे हे धरण तीनही तालुक्‍यांना वरदान ठरले आहे.

मागील काही दिवसांपासून धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने भामा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे भरले आहेत. त्याचप्रमाणे ज्या गावांच्या पाणीयोजना नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत, त्यांना याचा फायदा होणार आहे.