पत्नीसह या; अन्यथा कर्जमाफी नाही!

Representational Image
Representational Image

वडगाव निंबाळकर : सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी सपत्नीक उपस्थित रहावे अन्यथा अर्ज भरता येणार नाहीत अशी अजब अट दोन दिवसांपूर्वी घातली आहे.

पत्नी नसलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्जात पर्याय नसल्याने त्यांना अर्ज भरता येत नाहीत. सरकारच्या या अजब अटीमुळे गेल्या दोन दिवसांपासुन बारामती तालुक्यात कर्जमाफीचे अर्ज भरण्याची संख्या रोडावली आहे. कर्जदार शेतकऱ्यांचे लाभधारक ठरण्यासाठी धडपड चालाली आहे. तयासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवणूक करण्यात वेळ जात आहे. पण सरकारच्या जाचक अटींमुळे बारामती तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

तालुक्यातील १७ महाईसेवा केंद्र, ग्रामपंचायतीमधील संग्राम कक्ष आदी ठिकाणांहून अर्ज भरता येतील असे सरकारकडुनकडून सांगीतले असले तरी तालुक्यातील हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या महाईसेवाकेंद्रत ऑनलाईन अर्ज भरले जात आहेत.

ग्रामपंचायतीमधील संग्राम कक्ष सद्या बंद अवस्थेत आहेत. यामुळे येथून अर्ज करण्यात अडचण येत आहे. पुरेशी व्यवस्था न करता ऑनलाईनची सक्ती केल्याने गोंधळाचे वातावरण आहे. वडगाव निंबाळकर येथील महाईसेवाकेंद्राला अर्ज भरण्यासाठी लागणारी यंत्रणा नसल्याने शेतकऱ्यांचे अर्ज भरले जात नव्हते. कोऱ्हाळे येथील केंद्रात होळ, सदोबाचीवाडी,  वडगाव निंबाळकर, मुढाळे, लाटे, थोपटेवाडी या गावातील शेतकऱ्यांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती.

गेल्या पाच-सहा दिवसांत १२५ शेतकऱ्यांचे अर्ज भरल्याची माहिती कोऱ्हाळे बुद्रुक महाईसेवा केंद्र चालक प्रमोद पानसरे यांनी दिली. बहुतांशी 'महा-ई-सेवा' केंद्रात ठसे घेण्याची व्यवस्था नसल्याने अर्ज भरता येत नव्हते. शेतातील काम धंदा सोडून कर्ज माफीच्या भाबड्या अपेक्षेपोटी सध्या शेतकरी महाईसेवाकेंद्रबाहेर रांगा लावून आहेत.

एका शेतकऱ्याचा अर्ज भरण्यासाठी बराच अवधी जातो. यातून ही सेवा मोफत द्यायची असल्याने केंद्र चालकही वैतागून जात आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देउन केंद्रचालक मेटाकुटीला आले आहेत.

यातच गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्याने पत्नीचा ठसा दिल्याशिवाय अर्ज पूर्ण होणार नसल्याच्या सूचना आल्याने केंद्रातून शेतकऱ्यांना 'जोडीनी या' असा सल्ला दिला जात आहे. यातून शेतकरी व केंद्रचालक यांच्यात हमरातुमरीचे प्रकार होताना दिसत आहेत.

सरकारच्या दररोज बदलणार्‍या विविध अटींमुळे लाभधारक ठरू पाहणार्‍या शेतकऱ्याला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असल्याने भीक नको पण कुत्र आवरा अशी अवस्था शेतकऱ्यांची सरकारने केल्याच्या प्रतिक्रिया मुढाळे येथील सदाशिव कारंडे यांनी अर्ज भरतेवेळी व्यक्त केली.

परिसरातील विविध केंद्रावर भेटी दिल्या असता सरकारच्या पद्धतीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बारामती तालुक्यात गुरूवार ता. ३ पर्यंत विविध केंद्रातून १४९९ शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरले गेल्याची माहिती सहाय्यक निबंधक एसएस कुंभार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com