कांद्याने खाल्ला भाव; प्रति किलोचा भाव 20 ते 26 रुपयांपर्यंत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

देशातील विविध राज्यांतून कांद्याला मागणी वाढली आहे. आपल्याकडील गरवी कांद्याचा हंगाम हा एप्रिल महिन्यात संपतो. त्यानंतर साठवण केलेला आणि इतर राज्यांतील कांद्यामुळे पुरवठा सुरळीत राहतो. आपल्याकडील हळवा कांद्याचा हंगाम आता सप्टेंबर महिन्यात सुरू होईल. तसेच इतर राज्यांतील उत्पादन कमी असल्याने स्वाभाविकपणे महाराष्ट्रातील कांद्याची मागणी वाढली आहे. याचा परिणाम पुढील एक दोन महिन्यांत कायम राहील. 
- नाना ताम्हाणे, व्यापारी

पुणे : इतर राज्यातून वाढलेली मागणी आणि उत्पादन कमी यामुळे कांदा आता भाव खाऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांतील सहा हंगामांत शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या कांद्याला आता भाव मिळू लागल्याने शेतकरी सुखावला आहे. 

पुण्याच्या घाऊक बाजारात सध्या सरासरी प्रति दिन 90 ते 120 ट्रक इतकी कांद्याची आवक होत आहे. आवक चांगली होत असली, तरी कांद्याला स्थानिक बाजाराप्रमाणेच इतर राज्यांतून मागणी वाढली आहे. मध्य प्रदेश राज्य सरकारने तेथील कांदा खरेदी केला होता. हा कांदा संपला असून, गुजरात आणि राजस्थान येथे उत्पादन घटले आहे. कर्नाटकातील हंगामही उशिरा सुरू होत असून, तेथील उत्पादनही निम्म्याने घटले आहे. त्याच वेळी कांदा निर्यातीची मागणी चांगली आहे. या सर्व कारणांमुळे कांदा पुरवठ्यासाठी महाराष्ट्रातील बाजारपेठेचा पर्याय सध्या उपलब्ध आहे. याचा परिणाम मागणीवर झाला असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत घाऊक बाजारातील भाव दुप्पट झाले आहे. प्रति किलोचा भाव हा 20 ते 26 रुपयांपर्यंत पोचला आहे. काही कांद्याला यापेक्षाही अधिक भाव मिळाल्याचा दावा केला जात आहे. 

गेल्या दोन वर्षांत कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. गेल्या महिन्यात कांद्याचा भाव प्रति किलोला पाच रुपये इतका मिळत असल्याने उत्पादनखर्चही भरून काढणे शक्‍य होत नव्हते. आता कांद्याला भाव मिळू लागल्याने शेतकरी समाधानी आहेत. मात्र ज्याच्याकडे साठा आहे अशा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील काही भागात सध्या कांदा उत्पादन चांगले आहे. घाऊक बाजारातील भाव वाढल्याने त्याचा परिणाम हा किरकोळ विक्रीवर झाला आहे.