उत्सुकता, जल्लोष अन्‌ आनंदोत्सव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

पुणे : प्रत्येकाच्या मनात निकालाची धाकधूक अन्‌ उत्सुकता होती... निकाल लागताच तरुणाईने जल्लोष केला. 'हिप हिप हुर्रे...' आणि 'आव्वाज कुणाचा...' अशा घोषणांनी विजयाचा आवाज बुलंद करत तरुणाईने आनंदोत्सव साजरा केला. निमित्त होते 'सकाळ'च्या 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)'द्वारे यिन प्रतिनिधींच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालाचे. 

पुणे : प्रत्येकाच्या मनात निकालाची धाकधूक अन्‌ उत्सुकता होती... निकाल लागताच तरुणाईने जल्लोष केला. 'हिप हिप हुर्रे...' आणि 'आव्वाज कुणाचा...' अशा घोषणांनी विजयाचा आवाज बुलंद करत तरुणाईने आनंदोत्सव साजरा केला. निमित्त होते 'सकाळ'च्या 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)'द्वारे यिन प्रतिनिधींच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालाचे. 

'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या नेतृत्व विकास उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण विभागात विविध महाविद्यालयांत घेतलेल्या यिन प्रतिनिधींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर तरुणाईचे सेलिब्रेशन सुरू झाले. विजयी प्रतिनिधींना मित्रांनी उचलून घेऊन आनंदोत्सव साजरा केला. तसेच निवडून आलेल्या प्रतिनिधींना शुभेच्छा देत युवक-युवतींनी विजयाच्या घोषणा दिल्या. उत्साह, आनंद व जल्लोषाने संपूर्ण वातावरण भारून गेले होते. निवडणुकीला उभ्या असलेल्या मित्र-मैत्रिणींना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे ग्रुप उपस्थित होते. निवडणुकीच्या वेळी दिसलेला जोश निकालाच्या वेळेसही कायम होता. 

सकाळी अकरा वाजल्यानंतर मतमोजणीस सुरवात झाली आणि एक-एक करून निकाल जाहीर करण्यात आला. मतमोजणी होतानाचे कुतूहल आणि आपल्या महाविद्यालयाचा प्रतिनिधी 'यिन'च्या निवडणुकीत जिंकून आल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. काही महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या. त्याचा निकाल लागल्यानंतरही तरुणाईचा आनंद द्विगुणित झाला. 

'यिन'मधील विजयी प्रतिनिधींच्या निकालाची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल. 

यिन प्रतिनिधी म्हणून निवडून आल्याचा आनंद आहे. या यशाचे श्रेय मला मतदान करणाऱ्या प्रत्येकाला जाते. मी 'यिन' व्यासपीठाच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी काम करणार आहे. तसेच कोणाही तरुण-तरुणींना अडचण आल्यास त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा माझा प्रयत्न असेल. 
- मेघा शिरसाट, विजयी प्रतिनिधी 

यिनमध्ये प्रतिनिधी म्हणून निवडून आल्याचा आनंद असून, या व्यासपीठाचा वापर मी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी करणार आहे. या निवडणुकीद्वारे निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेता आला. स्वतःमधील नेतृत्वगुणाला वाट मिळाली. यापुढे विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी काम करणार आहे. 
- मोनाली पवार, विजयी प्रतिनिधी