गोंड्याचा धागा देतो प्रेमाची आठवण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

पुणे : ''बहिणी लहान असो की मोठी... रक्षाबंधनाला मायेचा धागा ती बांधते. तेव्हा लाडक्‍या बहिणीला भाऊही भेटवस्तू देतो. कारण, भेटवस्तू घेण्याचा हा तिच्या हक्काचा दिवस असतो. म्हणूनच आम्ही आनंदाने लाडक्‍या बहिणीसाठी कुटुंबीयांसमवेत रक्षाबंधन साजरे करतो. बहिणीच्या आवडीचे गोडधोड भोजनही करतो'', रोहित वाजपेयी त्याचा अनुभव सांगत होता; तर ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक राजेश ललवाणी म्हणाले, ''लहानपणी गोंड्याच्या धाग्याची राखी बहीण बांधायची. तो धागा आजही बहीण-भावाच्या प्रेमाची आठवण करून देतो.'' 

श्रावण शुद्ध पौर्णिमा अर्थातच राखी पौर्णिमा सोमवारी घरोघरी उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा खंडग्रास चंद्रग्रहण होते. त्यामुळे सूर्योदयाला कुलाचाराप्रमाणे देवादिकांची पूजाअर्चा झाल्यावर बहिणींनी भावांना राखी बांधली. ग्रहण कालावधी रात्री 10 वाजून 52 मिनिटांपासून 12 वाजून 49 मिनिटांपर्यंत होता. परंतु, दुपारी एक वाजल्यापासूनच ग्रहणाचे वेध लागले. मात्र, रात्री 10 वाजेपर्यंत राखी बांधता येऊ शकत असल्याने अनेकांनी रक्षाबंधन उत्साहात साजरे केले. बहीण-भावांसहित आप्तेष्टही यानिमित्त एकमेकांच्या घरी जमले होते. 

राजश्री बोरा म्हणाल्या, ''जैन धर्मीयांमध्ये रक्षाबंधन हा सण सर्वांत मोठा असतो. या दिवशी जिवाभावाचा भाऊ भेटतो. त्याला आवडीचे पदार्थ खाऊ घालायला मिळतात,'' तर दीक्षा पांडे म्हणाली, ''आजकाल अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्त व्यग्र झाले आहेत. नातेवाइकांना भेटणेही मुश्‍कील होते. सण-उत्सवानिमित्ताने एकत्र येता येते. राखी पौर्णिमेनिमित्त आम्ही सर्व भावंडे एकत्र आलो. भावाला राखी बांधून आम्ही साऱ्यांनी मिष्टान्न भोजन केले. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले.'' 

दरम्यान, शहरात सामाजिक संस्थांनी विविध उपक्रमांद्वारे सामूहिक रक्षाबंधनाचे कार्यक्रम आयोजिले होते.