गडकिल्ल्यांवर झळकणार माहितदर्शक फलक

गणेश बोरुडे
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

तळेगाव स्टेशन : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गडकिल्ल्यांवर गेल्यानंतर इतिहासप्रेमी आणि पर्यटकांना संबंधित किल्ल्याची किमान प्राथमिक माहिती मिळावी, या हेतूने सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे लोकसहभागातून 'जागर दुर्ग इतिहासाचा' मोहिमेअंतर्गत किमान १०० किल्ल्यांवर माहिती असणारे फलक लावण्यात येणार आहेत.

तळेगाव स्टेशन : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गडकिल्ल्यांवर गेल्यानंतर इतिहासप्रेमी आणि पर्यटकांना संबंधित किल्ल्याची किमान प्राथमिक माहिती मिळावी, या हेतूने सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे लोकसहभागातून 'जागर दुर्ग इतिहासाचा' मोहिमेअंतर्गत किमान १०० किल्ल्यांवर माहिती असणारे फलक लावण्यात येणार आहेत.

प्रेरणेचा खजिना असलेले स्वराज्यातील गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव. एरवी एखाद्या किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्याच्या ऐतिहासिक माहितीचा फलक लावलेला अभावानेच आढळतो. त्यामुळे इतिहासप्रेमी आणि पर्यटकांपासून ऐतिहासिक माहितीचा खजिना दुर्लक्षित राहतो. त्यामुळे किल्ल्याला भेट देणाऱ्यांना, संबंधित किल्ल्याचा पूर्वोतिहास आणि किमान प्राथमिक माहिती मिळावी यासाठी गडकिल्ले संवर्धनाचा वसा घेत झटणाऱ्या सहयाद्री प्रतिष्ठानतर्फे माहितीदर्शक फलक लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

राज्य आणि केंद्रीय पुरातत्व विभागाच्या रीतसर परवानगीनेच हे महत्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील किमान १०० किल्ल्यांवर संबंधित किल्ल्याची माहिती असणारा फलक लावण्यात येणार आहे. एखाद्या किल्ल्यावर आधीपासूनच फलक अस्तित्वात असल्यास त्याचे नूतनीकरण करण्यात येईल.

संबंधित फलकांवर किल्ल्याचा पूर्वोतिहास ठिकाणी, किल्ल्याचे पावित्र्य राखण्याचे आव्हान, दिशादर्शक आणि सुरक्षेविषयक सूचना, वास्तुदर्शक माहिती छापण्यात येणार आहे. त्यानंतर शक्य त्या किल्ल्यांसंदर्भात लघुपट निर्मिती करून त्याद्वारेही किल्ल्याची माहिती दिली जाईल.

फलक बनविताना रंग, आकार, शब्दरचना आदींबाबत पुरातत्व विभागाने घालून दिलेल्या अटींचे काटेकोर पालन करण्यात येईल, अशी ग्वाही सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली. 

मावळ आणि कोकणातील किल्ल्यांपासून सुरुवात होणाऱ्या या मोहिमेचा खर्च पूर्णपणे लोकवर्गणीतूनच केला जाणार आहे. इच्छुकांनी सदर कामास आर्थिक,वस्तू अथवा कार्यस्वरूपात हातभार लावण्याचे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: marathi news marathi websites Forts in Maharashtra Sahyadri Pratishthan