काश्‍मिरी तरुणांसमोर दुहेरी आव्हान : एन. एन. व्होरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

पुणे : ''जम्मू-काश्‍मीरच्या नागरिकांना दहशतवाद्यांना तोंड द्यावे लागते. त्याचा परिणाम तेथील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनावरही झाला आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी प्रयत्न आवश्‍यक आहेत. परंतु देशांतर्गत व बाह्य परिस्थितीचाही सामना काश्‍मिरी तरुणांना करावा लागतोय,'' असे मत जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी व्यक्त केले. 

सरहद पुणे आणि खडके फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कल्हण पंडित लिखित, 'राजतरंगिणी' या काश्‍मीरचा काव्यात्मक इतिहास असलेल्या संस्कृत ग्रंथाच्या मराठी अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन वोहरा यांच्या हस्ते झाले. लेखिका अरुणा ढेरे आणि प्रशांत तळणीकर यांनी या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्राणकिशोर कौल, उद्योजक अभय फिरोदिया, संजय नहार, भारत देसडला, संजीव खडके, शैलेश वाडेकर उपस्थित होते. 

वोहरा म्हणाले, ''जम्मू-काश्‍मीर सरकार आणि स्थानिक संस्थांमार्फत तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र सरहद संस्थेचेही पुण्यातील कार्य स्तुत्य आहे. काश्‍मिरी तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्था कार्यरत आहे. सव्वाशे कोटींच्या आपल्या देशात तीनशे भाषा बोलल्या जातात. प्रत्येक प्रांताचे वैशिष्ट्य निराळे आहे. तसाच काश्‍मीरचा इतिहास 'राजतरंगिणी'मध्ये वर्णिला आहे. काश्‍मीरलाही सामाजिक, सांस्कृतिक दृष्टिकोनातून हजारो वर्षांची परंपरा आणि स्वतंत्र प्रादेशिक ओळख आहे.'' देशातील प्रत्येक कुटुंबाला अन्न, वस्त्र, निवारा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. तेथील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न व्हावेत, असेही व्होरा म्हणाले. 

फिरोदिया म्हणाले, ''सांस्कृतिक वारसा हा राजकारणापेक्षाही प्रभावी ठरतो. विविधता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. काश्‍मीरलाही सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे.'' कौल म्हणाले, ''ऐतिहासिक परंपरा महत्त्वाची असते. 'राजतरंगिणी' या ग्रंथातून ती विशद केली असून, मानवीय नातेसंबंधांचे वर्णन त्यात केले आहे.''

Web Title: marathi news marathi websites N N Vhora Jammu Kashmir Pune News