समृद्ध सेंद्रिय शेतकरी गटाच्या कुदरती भातशेतीला बहर

गणेश बोरुडे
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

तळेगाव : रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळून समाजाच्या निरोगी स्वास्थ्यासाठी सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्याच्या हेतूने मावळातील 21 शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या 'समृद्ध सेंद्रिय शेतकरी' गटाचा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. सुदवाडी येथे एकवीस गुंठ्यात पूर्णत: सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या कुदरत भात वाणाचे जोमदार पीक 135 दिवसांत काढणीला आले आहे. 

तळेगाव : रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळून समाजाच्या निरोगी स्वास्थ्यासाठी सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्याच्या हेतूने मावळातील 21 शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या 'समृद्ध सेंद्रिय शेतकरी' गटाचा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. सुदवाडी येथे एकवीस गुंठ्यात पूर्णत: सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या कुदरत भात वाणाचे जोमदार पीक 135 दिवसांत काढणीला आले आहे. 

पर्यावरण, आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्या भविष्यकाळात सेंद्रिय शेतीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे मानवी आरोग्यासह जमिनीवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता मावळ तालुक्‍यातील 21 शेतकऱ्यांनी गेल्या मे महिन्यात 'समृद्ध ऑरगॅनिक फार्मर्स क्‍लब'ची स्थापना केली. 'समृद्ध क्‍लब'ने पहिला प्रयोग भातशेतीवर क्‍लबचे सदस्य शांताराम दरेकर यांच्या भंडारा डोंगर पायथ्याशी असलेल्या सुदवडी शिवारातील 12 गुंठ्यांवर करण्याचे ठरले. त्यासाठी मध्य प्रदेशात एका शेतकऱ्याने विकसित केलेल्या 'कुदरत' या भात वाणाच्या चार किलो बियाणे वापरून जूनमध्ये एका गुंठ्यात रोपनिर्मिती करण्यात आली. त्यानंतर लागवडीसाठी निवडलेल्या 12 गुंठ्यांत पारंपरिक पद्धतीने भाजणी करून शेण खत, गोमूत्र फवारणी करून गादी वाफ्यांमध्ये जुलैत रोप लागवड करण्यात आली. विकसित 'कुदरत' वाण इतरांपेक्षा 15 दिवस कमी अर्थात 135 दिवस घेतो. 

दरम्यानच्या काळात पीकवाढीसाठी शेण खत, गावरान गायीचे गोमूत्र, काळा गूळ, वारुळाची माती आदींचे मिश्रण पाण्याबरोबर एकदा सोडले. सेंद्रिय शेतीचे सूत्र वापरून लागवड केलेल्या दोन काड्यांच्या एका भातरोपाला सरासरी 15 फुटवे येऊन पीक जोमाने बहरले असून ओंब्यांची वाढही चांगली झाल्याचे दिसते. येत्या 15 दिवसांत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे पीक काढणीयोग्य होईल. 

साळीचा आकार आणि वाढ पाहता साधारणत: 12 पोती साळीतून एक टन तांदुळाचा उतारा होईल, असा अंदाज आहे. लागवड आणि पिकासाठी इतरांच्या तुलनेत चौपट कमी खर्चात पिकविण्यात आलेल्या 'कुदरत' वाणाचा तांदूळ चवदार, कमी चिकट आणि स्टार्चचे प्रमाण कमी असणारा आहे. याच पद्धतीने इतर आठ सदस्यांच्या शेतातही सेंद्रिय पद्धतीने भातलागवड करण्यात आली असून काढणीनंतर भाजीपाला पीक घेण्याचे क्‍लबचे नियोजन आहे. 

'समृद्ध ऑरगॅनिक फार्मर्स'चे अध्यक्ष दीपक राऊत, उपाध्यक्ष बाळासाहेब गाडे, सचिव नंदकुमार ढोरे, कार्याध्यक्ष कैलास भेगडे, शांताराम दरेकर आणि सदस्यांना निवृत्त कृषी अधिकारी रत्नाकर जाधव आणि मुळशी तालुक्‍यातील माण येथील अभिनव फार्मर्स क्‍लबचे संस्थापक ज्ञानेश्‍वर बोडके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. हे जोमाने बहरलेले पीक पाहण्यासाठी मावळ, मुळासह खेड तालुक्‍यातील भात शेतकरी भेटी देत माहिती जाणून घेताना दिसतात. सेंद्रिय उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी, म्हणून सहकारी तत्त्वावर सेंद्रिय शेतकरी बाजार चालू करण्याचा मनोदय क्‍लबच्या सदस्यांनी बोलून दाखविला.