चुकीचे काम केल्यास कारवाई : अजित पवारांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

बारामती : ''कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, चुकीचे काम करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,'' असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संगणकीय लिलाव पद्धतीचे उद्‌घाटन शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बाजार समितीचे सभापती रमेश गोफणे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ऍड. राजेंद्र काटे देशमुख, संभाजी होळकर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सोमेश्वर शाखेतील घोटाळ्याचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले, ''सर्वांनी प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे, कोणी काही चुकीचे काम करणार असेल तर त्याची गय केली जाणार नाही किंवा त्याला पाठीशीही घातले जाणार नाही. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.'' 
''जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कामकाजात गती आणण्यासाठी आगामी काळात नोकरभरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तांत्रिकविषयक भरती होणार असून योग्य उमेदवारांनाच संधी दिली जाईल,'' असेही त्यांनी सांगितले. 

बारामती बाजार समितीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथे लिलावाची माहिती देण्यासाठी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत, मुख्य प्रवेशद्वारावरच शेतीमालाची संगणकीकृत नोंदणी केल्यावर मोबाईलवरही ती माहिती दिली जाते. मालाला किती भाव मिळाला आहे, हे शेतकऱ्यांना लगेचच समजावे अशीही व्यवस्था करण्यात आली आहे. बारामतीच्या बाजारपेठेसह राज्यातील इतर बाजारपेठेतील भावही या निमित्ताने पाहता येतील. केंद्र सरकारने ई ऑक्‍शन या योजनेअंतर्गत या संगणकीय लिलाव पद्धतीसाठी बारामती बाजार समितीला एक कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या बाबत समितीला मदत केली आहे. 

बाजार समितीचे सभापती गोफणे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. उपसभापती विठ्ठल खैरे यांनी आभार मानले. 

'सौरऊर्जेकडे वळावे' 
सौरऊर्जेपासून वीजनिर्मितीचा खर्च आता कमी होतो आहे, त्यामुळे भविष्यात सौरऊर्जा निर्मितीकडे वळावे लागेल, अशी सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.