मल्टिप्लेक्‍सकडून पार्किंग शुल्काची 'लूट' 

Image taken at phoenix city mall Pune
Image taken at phoenix city mall Pune

पुणे : चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या आरतीकडून दुचाकी पार्किंगसाठी 30 रुपये, तर ग्रुपसोबत आलेल्या स्वप्नीलकडून चारचाकी पार्किंगसाठी 60 रुपये शुल्क आकारण्यात आले... ही आहे मल्टिप्लेक्‍सकडून होणारी लूट किंवा वसुली. पार्किंगसाठीचे अवाजवी शुल्क आणि खाद्यपदार्थांसाठी आकारले जाणारे भरमसाट पैसे असे चित्र शहरातील सर्वच मल्टिप्लेक्‍समध्ये पाहायला मिळत आहे. 

मल्टिप्लेक्‍समध्ये चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याची बाटली आणण्यास अटकाव केल्यास आणि अवाजवी पार्किंग शुल्क आकारल्यास मल्टिप्लेक्‍सचालकांवर कारवाई केली जाईल, असे राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले होते. हे शुल्क बंद करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शहरातील मल्टिप्लेक्‍समधील स्थितीचा 'सकाळ'च्या वतीने शनिवारी आढावा घेण्यात आला.

त्यात सर्वच मल्टिप्लेक्‍समध्ये भरमसाट पार्किंग शुल्क आकारण्यात येत असल्याचे समोर आले आहे. हे शुल्क आकारताना कोणतेही नियम पाळले जात नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. 

दुचाकी पार्किंगसाठी 10 ते 40 रुपये आणि चारचाकी पार्किंगसाठी 60 रुपयांच्या पुढे शुल्क आकारण्यात येत आहे. तसेच चित्रपटगृहात प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याची बाटली आणण्यास मनाई असून, चित्रपटगृहातील खाद्यपदार्थ घेणे प्रेक्षकांसाठी बंधनकारक असल्याने मल्टिप्लेक्‍सकडून प्रेक्षकांची लूटमार होत आहे. पार्किंग शुल्क कमी करणे आणि बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास परवानगी देण्याबाबतचे लेखी आदेश अजूनही मिळालेले नाहीत, असे मल्टिप्लेक्‍सचालकांचे म्हणणे आहे. 

याविषयी प्रेक्षक प्राची गायकवाड म्हणाल्या, ''मल्टिप्लेक्‍समार्फत चित्रपटगृहातच खाद्यपदार्थ विकले जातात; मात्र त्यांची किंमत आम्हा प्रेक्षकांना परवडणारी नाही. बाहेर पंधरा रुपयाला मिळणारा वडापाव आणि समोसा चित्रपटगृहात साधारणतः 30 रुपयांना मिळतो. त्यात पार्किंगसाठी मनमानी शुल्क द्यावे लागते. काही मल्टिप्लेक्‍समध्ये दुचाकी पार्किंगला एका तासासाठी 30 रुपये आणि एक तासापेक्षा अधिक कालावधी झाल्यास जादा शुल्क आकारले जाते. शुल्क रद्द करण्याबाबतचा निर्णय चांगला असून, त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी.'' 

विमाननगर, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क येथील मल्टिप्लेक्‍समध्ये चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची लूट सुरू आहे. त्यांच्याकडून वाहनतळावर मोटार किंवा दुचाकी लावण्यासाठी बेकायदा शुल्क आकारले जात आहे. खाद्यपदार्थ, पाण्याची बाटली व शीतपेये आदींची किंमत अव्वाच्या सव्वा असल्याचे दिसून आले.

'सकाळ'च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत शनिवार व रविवारी येणाऱ्या प्रेक्षकांकडून पार्किंग शुल्क म्हणून चारचाकीसाठी तब्बल तीनशे रुपये, तर दुचाकीसाठी तीस रुपये शुल्क घेतले जात आहे. चारचाकीसाठी तीन तासांनंतर प्रत्येक तासासाठी दहा रुपये इतके शुल्क, तर इतर दिवशी चारचाकीला दोनशे आणि दुचाकीला वीस रुपये शुल्क आकारले जात असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. नगर रस्ता, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क मॉलमधील मल्टिप्लेक्‍समध्ये पार्किंगसाठी पन्नास, तर दुचाकीसाठी वीस रुपये शुल्क आहे. सर्वच मल्टिप्लेक्‍समध्ये खाद्यपदार्थ व पिण्याच्या पाण्याचे दर अधिक आहेत. त्यामुळे कोणालाही खाद्यपदार्थ किंवा पिण्याचे पाणी घेऊन जाता येत नाही. 

सातारा रस्त्यावरील मल्टिप्लेक्‍समध्येही अशीच परिस्थिती आहे.

मल्टिप्लेक्‍सचालकाला लेखी आदेश न मिळाल्यामुळे पार्किंग आणि खाद्यपदार्थांचे शुल्क नेहमीप्रमाणे आकारले जात आहे; मात्र प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ आत नेण्यास परवानगी देण्यात आल्याचे मल्टिप्लेक्‍सच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, चित्रपटगृहात बाहेरील खाद्यपदार्थ आणणारे अनेक प्रेक्षक दिसून आले. काहींना खाद्यपदार्थ आत नेता येतील, याबाबत माहिती नव्हती. येथे पार्किंगसाठी 10 ते 30 रुपये शुल्क आकारले जात आहे. 

पाहणीत काय आढळलं?

  • सर्वच मल्टिप्लेक्‍समध्ये भरमसाट पार्किंग शुल्क 
  • दुचाकीसाठी दहा ते चाळीस रुपयांपर्यंत शुल्क 
  • चारचाकीसाठी चाळीसपासून दोनशे रुपयांपर्यंत वसुली 
  • खाद्यपदार्थांची चार ते पाचपट जादा दराने विक्री 
  • एमआरपीपेक्षा जादा दराने खाद्यपदार्थांची विक्री 
  • जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com