अकरा हजार शेतकऱ्यांच्या यादीमध्ये दुरुस्ती होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

पुणे : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अर्जात आधार क्रमांक, नावात किंवा अन्य चुका झालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. या चुका दुरुस्त करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील 11 हजार शेतकऱ्यांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. दुरुस्ती करून हे अर्ज पुन्हा राज्य सरकारकडे योजनेतील लाभ देण्यासाठी पाठविले जाणार आहेत. 

या संदर्भात जिल्हा उपनिबंधक आनंद कटके म्हणाले, ''जिल्ह्यातून 3 लाख 2 हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी 24 हजार 995 अर्ज चुका किंवा अपूर्ण माहितीमुळे अपात्र ठरविले होते. शेतकरी किंवा राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून अर्ज भरताना झालेल्या चुकांमुळे ऑनलाइन माहिती व बॅंकांकडील माहितीमध्ये तफावत दिसून आली. त्यामुळे या शेतकऱ्यांना लाभार्थ्यांच्या हिरव्या यादीमध्ये समाविष्ट केले नव्हते. या अपात्र अर्जांपैकी 11 हजार अर्जदार शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविली आहे.'' 

चुकीच्या दुरुस्तीनंतर लाभ 
अर्जात चुका झालेले लाभार्थी शेतकरी राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे खातेदार असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकेसह जिल्हा मध्यवर्ती बॅंकांना याद्या पाठविल्या जातील. यामध्ये विविध कार्यकारी संस्थांकडे (सोसायट्या) जर माहिती उपलब्ध असेल, तर त्यांच्याकडे संबंधित नावांची यादी पाठवली जाईल. अथवा, संबंधित शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून अर्जातील चुका दुरुस्त केल्या जातील. दुरुस्त अर्जामधील माहिती पुन्हा नव्याने पोर्टलवर 'अपलोड' केली जाईल. त्यानंतर या अर्जदारांना कर्जमाफी योजनेतील एकवेळ समझोता, प्रोत्साहनपर लाभ त्यानुसार लाभ दिला जाईल.

Web Title: marathi news marathi websites Pune News Farmers Loan Waiver