समाजाच्या फडावर उपेक्षित कलाकाराचा तमाशा

समाजाच्या फडावर उपेक्षित कलाकाराचा तमाशा

तळेगाव स्टेशन : कधीकाळी तमाशाचा फड गाजवलेल्या शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील जुन्या पिढीतील तमाशा कलावंताची आजमितीला कृतघ्न समाजाकडून घोर उपेक्षा झाली आहे. हालाखीची अवस्था पाहून, दिवंगत तमाशा कलावंत दादू इंदुरीकरांच्या जन्मभूमी मावळ तालुक्यातील इंदोरीच्या इंद्रायणी अंध अनाथ संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंची भेट लाभल्याने त्या वयोवृद्ध ८५ वर्षीय कलावंतास जगण्याची नवी उमेद मिळाली आहे.

तमाशा म्हणजे महाराष्ट्राची लोककला आणि लोकधारा. कधीकाळी तमाशा म्हणजे मराठी संस्कृतीचे अविभाज्य अंग बनले होते. परंतु, मनोरंजन आणि कला जगतात काळानुरुप होत चाललेल्या बदलाने महाराष्ट्राची ही लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर असून कधीकाळी तमाशाचा फड गाजवलेल्या राजश्रयाअभावी तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तमाशा कलावंताचे गाव म्हणून पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील सविंदणे गाव कधीकाळी भारताच्या नकाशावर आले. तमासगीर कै. गणपतराव चव्हाण सविंदणेकर यांच्या निधनानंतर त्यांचा फड आणि १८ वर्षाचा धाकटा भाऊ दत्तोबा चव्हाण पोरका झाला. त्याला पडत्या काळात आश्रय देण्याचे काम तत्कालीन तमाशा सम्राट दत्ता महाडिक आणि चंद्रकांत ढवळपुरीकर द्वयीनी केले. पुढे उतरत्या वयाला फड सोडल्यानंतर काही वर्षांनी एकुलता एक मुलगा मरण पावला. त्यातून सावरतो न सावरतो तोच  २००३ मध्ये अपघातात डावा पाय निकामी होऊन, शरीर अधू झाल्याने चालणे फिरणे मुश्किल झाले. कुण्या दानशूराने जयपूर फुटमध्ये पाय बसवल्यानंतर कुबड्याच्या आधाराने फरफटणे चालू आहे. वयामुळे शरीर साथ देत नाही, कष्टासाठी अंगात ञाण नाही. उपजीविकेचे साधन उरले नाही, मरण येत नाही म्हणून केवळ जगायचे. विधवा सुनेच्या मोलमजुरीच्या पैक्यावर नातवाचे शिक्षण आणि रोजची गुजराण कशीबशी चालते. तमाशा कलावंतांना मिळणारे सरकारी मानधन कधीच वेळेवर मिळत नाही. नावाजलेला कलावंत म्हणून कधीकाळी ज्या गावाने हार घालून खांदयावर घेतले, त्याच गावात आर्थिक आणि शारीरिक दुर्बलतेपुढे हार मानून जगावे लागत आहे. ज्या पारावर कधीकाळी तमाशात राजा म्हणून सिंहासनावर बसलो त्याचा पारावर आज प्रत्यक्ष जीवनात भिकाऱ्यांची भूमिका करतोय. हलाखीची परिस्थिती व्यथित करताना ८५ वर्षीय ज्येष्ठ तमाशा कलावंत दत्तोबा चव्हाण सविदंणेकर आणि त्यांची दैना ऐकून घेणाऱ्या इंद्रायणी अंध अनाथ संस्थेच्या कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले.

काशिनाथ अाल्हाट, लक्ष्मण मखर, तात्या धांडे यांच्यामार्फत दत्तोबांची फरफट कानी पडल्यानंतर नेहरू शर्ट, धोतर, टोपी, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन थेट ७०-८० किलोमीटरवरुन मावळ तालुक्यातील इंदोरीच्या श्री साई फ्रेन्डं सर्कल आणि कै. दादु इंदुरीकर इंद्रायणी अंध अनाथ संस्थेचे संस्थापक संजय चव्हाण,राजेंद्र कडलग, धनराज खोमणे, तान्हाजी दिवसे धावून गेले. सविंदणे सरपंच वसंत पडवळ, सामाजिक कार्यकर्ते जवरी कोचर, पोपट शिंदे, फुला लंघे, गुलाब झेंडे आणि इतर समाजसेवींच्या उपस्थितीत गावातील श्री क्षेत्रपाळ भैरवनाथ  मंदिरासमोर तुटपुंजी का होईना भेट मिळालेली पाहून दत्तोबांना जगण्याची नवी उमेद मिळाली.

हलाखीच्या परिस्थितीने जीवनाचा तमाशा झालेला उपेक्षित, वयोवृद्ध कलावंत रोज आपल्या जीवनाचा वग मांडतोय तो मदतीच्या आशेनेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com