राहुल गांधी आता 2014 चे 'पप्पू' राहिलेले नाहीत : संजय राऊत

File photo of Rahul Gandhi
File photo of Rahul Gandhi

पुणे : ''काँग्रेसचे राहुल गांधी हे पूर्वीचे 2014 चे 'पप्पू' राहिलेले नाहीत. 2017 च्या गुजरात निवडणुकीचा प्रचार आणि वातावरण पाहिले की राहुल गांधी आता नेता बनले आहेत, असेच वाटते,'' असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात केले.

पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ''राहुल गांधी आमचे विरोधक आहेत. काँग्रेसमुक्त भारत ही भूमिका भाजपच्या आधी शिवसेना प्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली होती. पण आता राहुल गांधींच्या प्रचार सभा पाहिल्या की ते नेता बनले आहेत हे जाणवते.''

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभांमध्ये जी भूमिका मांडत आहेत, त्यावरही राऊत यांनी यावेळी टीका केली. ते म्हणाले, "गुजरातमध्ये भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच विकासाच्या मुद्द्यावर प्रचार न करता भावनिक मुद्द्यांवर प्रचार केला जात आहे. ही भ्रमिष्ठावस्था आहे. जेव्हा आपला बालेकिल्ला ढासळतो, तेव्हा असे होते. पंतप्रधान गुजरात मध्ये 40-40 सभा घेतात. वास्तविक आम्हीही पंतप्रधानांना मानतो. त्यांच्या पदाची प्रतिष्ठा त्यांनी ठेवायला हवी होती. जर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकता येत होती तर ती त्यांनी दिल्लीत बसून जिंकायला हवी होती.''

'चायवाला' या प्रचाराच्या मुद्द्यावरही राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, ''एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होतो, हा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीत झाला. ज्यावेळी मोदी गुजरातचे पंतप्रधान बनले त्याआधी कधी हा प्रचाराचा मुद्दा बनला नव्हता. मोदींचा जन्म 1950 चा. ते म्हणतात विसाव्या वर्षी मी माझे गाव वडनगर सोडून समाजकार्याला बाहेर पडलो. वडनगरला रेल्वे आली ती 1973 साली. मग मोदींनी वडनगर स्टेशनला चहा केव्हा विकला, हा माझा मुद्दा आहे." शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखे अनेक नेते गरीबीतूनच पुढे आले आहेत. त्यामुळे गरीबी हे राजकारणाचे भांडवल असू नये, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.

सरकारच्या जाहिरातबाजीवरही राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, "जाहिरातींवर तीन हजार कोटी रुपये खर्च केला जातो, याचाच अर्थ काहीही काम झालेले नाही, असा होतो. भाजपचे सरकार केंद्रात आल्यावर प्रत्येक माणसाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याची घोषणा केली गेली. त्यापैकी 15 हजार रुपये जमा झाले असते तरीही तीन हजार कोटीं रुपयांची जाहिरातबाजी करण्याची वेळ आली नसती. पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याच्या घोषणेवर काम झाले असते तरीही जाहिरातबाजी करावी लागली नसती,"

राममंदीराच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, "राममंदीर प्रश्नात शिवसेनेचीही प्रमुख भूमिका आहे. मोहन भागवतांसारखे नेते एका बाजूला म्हणतात की अयोध्येत मंदीर होणारच. दुसऱ्या बाजूला सरकार न्यायालयाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते. जर राममंदीर बनवायचेच असेल तर अध्यादेश काढून सरकारने ते बनवावे. बहुधा सरकारला 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हा निर्णय लांबवायचा असावा."

नारायण राणे यांच्या काल झालेल्या कोल्हापूरच्या सभेबाबत विचारले असता, मला त्याबद्दल माहित नाही, मी काही वाचलेले नाही, असे उत्तर राऊत यांनी दिले. स्वाभिमानाच्या गोष्टी कोणाच्या तोंडात शोभतात? असा टोलाही राऊत यांनी राणेंचे नांव न घेता लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com